मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाकडून भाजपला थेट अल्टिमेटम, युती धोक्यात?
Tv9 Marathi December 29, 2025 09:45 AM

राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महापालिका निवडणुकीसाठी राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये युती झाली आहे. तर काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट देखील या युतीमध्ये सहभागी आहे. दरम्यान जिथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती होण्याची शक्यता नाही, तिथे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होऊ शकते.  आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मिरा भाईंदरमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती धोक्यात आली आहे.  24 तासात युतीची बोलणी करा, अन्यथा आम्ही वेगळा निर्णय घेऊ, असा थेट अल्टिमेटमच शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी भाजपला दिला आहे.  दरम्यान यावर आता भाजप काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

निष्ठावंत नाराज

दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार पक्षप्रवेश झाले आहेत. ऐनवेळेस पक्षात प्रवेश केलेल्या लोकांना महापालिकेचं तिकीट पक्षाकडून मिळत असल्यानं भाजपमधील अनेक निष्ठावंत नाराज असल्याचं चित्र आहे, अनेक निष्ठावतांनी तर आपली जाहीर नाराजी देखील व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे कल्याण, डोंबिवली महापालिका निवडणुकीत जागा वाटपावसून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतरही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये देखील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा पक्षप्रवेश झाला, या पक्षप्रवेशाला भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. जर निष्ठावंतांवर अन्याय होणार असेल तर हे काही बरोबर नाही असं त्यांनी यावेळी म्हटलं होतं. मात्र तरी देखील भाजपमध्ये प्रवेश सुरूच आहेत. महापालिका निवडणुकीसाठी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. मुंबईतील जागा वाटपाचा फॉर्म्यूला देखील ठरला आहे, मात्र काही ठिकाणी अजूनही पेच कायम आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.