जम्मू काश्मीरमध्ये खळबळ! बडे नेते अचानक नजरकैदेत; काहीतरी मोठं घडण्याचे संकेत?
Tv9 Marathi December 29, 2025 09:45 AM

जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. सध्याच्या आरक्षण धोरणाविरुद्ध विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता या आंदोलनात सामील न होण्यासाठी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार आगा सय्यद रुहुल्लाह मेहदी यांच्यासह अनेक नेत्यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेहबूबा मुफ्ती, त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती, श्रीनगर लोकसभा खासदार रुहुल्लाह मेहदी, पीडीपी नेते वाहीद पर्रा आणि श्रीनगरचे माजी महापौर जुनैद मट्टू यांना नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक नेते नजरकैदेत

आज (रविवार) गुपकर रोडवर विद्यार्थ्यांकडून शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे असं या नेत्यांनी म्हटले होते, त्यामुळे प्रशासनाने या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक वर्षापूर्वी आरक्षणाची समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन केली आहे, मात्र अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या आंदोलनात उतरण्याबाबत भाष्य करणाऱ्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना पीडीपी नेते वाहीद पर्रा म्हणाले की, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यापासून रोखण्यासाठी नेत्यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे हे दुर्दैवी आहे. लोकसभा खासदार रुहुल्लाह मेहदी यांनी शनिवारी रात्री सोशल मीडियावर एक पोस्ट करत आमच्या निवासस्थानाबाहेर सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती देताना त्यांनी, “विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ शांततापूर्ण निदर्शने दडपण्यासाठी ही पूर्वनियोजित कारवाई आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

विद्यार्थी का आंदोलन करत आहेत?

जम्मू काश्मीरमधील सध्याच्या आरक्षण धोरणाविरुद्ध विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आरक्षण कोटा प्रणालीचा योग्य अवलंब करण्यासाठी विलंब होत आहे. एक वर्षापूर्वी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ही समस्या सोडवण्यासाठी एक समिती स्थापन केली होती, मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. याचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुपकर रोडवर शांततेत आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर नेत्यांनीही या आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.