मुंबईतील भांडुप पश्चिम रेल्वे स्टेशनबाहेर सोमवारी रात्री घडलेल्या भीषण अपघाताने सर्वांनाच हादरवून टाकले. बेस्टची इलेक्ट्रिक बस नियंत्रणबाहेर जाऊन गर्दीत घुसली, त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दहापेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत. मृत झालेल्या व्यक्तींमध्ये मराठी मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या पूर्वा रासमची आई प्रणिता रासम यांचा समावेश आहे.
शूटिंगनंतर परतताना काळाचा घाला
अंधेरी येथे मराठी मालिकेच्या शूटिंगसाठी गेलेल्या ११ वर्षीय पूर्वा रासमसोबत तिची आई प्रणिता या दिवसभर होत्या. शूटिंग संपल्यानंतर माय-लेकी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भांडुप स्टेशनवर उतरल्या. घरी जाण्यासाठी त्या ६०६ क्रमांकाच्या बसची वाट पाहत उभ्या होत्या. मात्र, दुर्दैवाने तीच बस नियंत्रण सुटून मागून येऊन त्यांच्यावर धडकली. बसने प्रणिता यांना चाकाखाली चिरडले, तर आईला वाचवण्याचा प्रयत्न करणारी पूर्वा बाजूला फेकली गेली. पूर्वाच्या डोळ्यांसमोरच तिची आई कायमची दूर गेली. पूर्वा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मंगळवारी प्रणिताच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पूर्वाने आईच्या निधनाचे दुःख व्यक्त करताना इलेक्ट्रिक बसेसबाबत संताप व्यक्त केला. ती म्हणाली, “या इलेक्ट्रिक बसेसचा आवाज येत नाही. पूर्वीच्या बसेसचा आवाज यायचा, त्यामुळे लोक सावध होऊन बाजूला होत असत. पण ही बस मागून कधी आली आणि आईला चिरडून गेली ते कळालेच नाही. माझी आई परत येणार नाही, पण या बसेस लगेच बंद करा, यापुढे कोणाचाही बळी जाऊ नये!”
बस चालकावर गुन्हा दाखल, चौकशी सुरू
अपघातात बसने इतका जोरदार धक्का दिला की, जवळचा लोखंडी विजेचा खांबही वाकला. मृतांमध्ये तीन महिला आणि एक पुरुष असून, इतर मृतांची नावे वर्षा सावंत (२५), मानसी गुरव (४९) आणि प्रशांत शिंदे (५३) अशी आहेत.
बेस्ट प्रशासनाने बस चालक संतोष रमेश सावंत (५२) याला तात्काळ निलंबित केले असून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, बसला तांत्रिक बिघाड होता की चालकाची चूक होती याची सखोल तपासणी सुरू आहे. बेस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले की, चालकाला योग्य प्रशिक्षण दिले होते की नाही, याचीही चौकशी होईल.