Nashik Municipal Election : नाशिकमध्ये शिवसेनेचा 'सर्जिकल स्ट्राईक'; भाजपने नाकारलेल्या १० माजी नगरसेवकांना दिले तिकीट!
esakal January 01, 2026 02:45 AM

नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे ८२ उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. उमेदवारी जाहीर करताना पंचवटी विभागात शिवसेनेने विशेषतः सावध भूमिका घेतली असून, भाजपकडून ज्यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आली, अशा अनेक इच्छुकांना शिवसेनेने संधी दिल्याचे चित्र आहे.

प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेचे चौघांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये विद्यमान नगरसेविका पुनम मोगरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून, उर्वरित तीन जागांबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आलेल्या रुची कुंभारकर यांचे नाव चर्चेत आहे.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. समता परिषदेचे बाळासाहेब कर्डक यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका कविता कर्डक यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक सतनाम राजपूत यांनाही संधी देण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये अधिकृत उमेदवारी जाहीर नसली तरी भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आलेले कमलेश बोडके यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याची जोरदार चर्चा आहे. प्रभाग क्रमांक ७ आणि ८ मध्ये शिवसेनेचे चौघांचे पॅनल तयार आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपकडून तयारी करणाऱ्या सविता गायकर व प्रेम पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका पल्लवी पाटील व इंदूबाई नागरे यांना शिवसेनेच्या तिकिटावर संधी मिळाली आहे.

प्रभाग क्रमांक ११ मध्येही शिवसेनेचे चौघांचे पॅनल निश्चित झाले आहे. प्रभाग क्रमांक १२ मध्ये स्मिता पाटोदकर व समीर कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपचे माजी पदाधिकारी गणेश मोरे यांना शिवसेनेने आपल्याकडे घेत उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजपचे पदाधिकारी राजेश आढाव यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आलेले पंडित आवरे यांनाही शिवसेनेने तिकीट दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका नीलिमा आमले यांच्या स्नुषा अश्विनी आमले यांनाही शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २५ मधून भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर माजी नगरसेवक अनिल मटाले यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, भाजपमध्ये उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या जवळपास दहा माजी नगरसेवकांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर निवडणूक लढविण्याची तयारी केली असून, त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता आहे.

Bhiwandi Politics: भिवंडीत तिकीट वाटपावरून बंडखोरी; सपा नेतृत्वाच्या अडचणी वाढल्या! अंतर्गत फुट उघड, नेमकं समीकरण काय?

भाजपमधील नाराजीचा शिवसेनेला फायदा

भाजपमध्ये उमेदवारी वाटपाच्या अंतिम टप्प्यात अनेक इच्छुकांना डावलण्यात आल्याने नाराजीचा सूर तीव्र झाला आहे. या नाराजांचा फायदा घेत शिवसेनेने त्यांना आपल्याकडे वळवले आहे. भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी व तयारी करणारे इच्छुक यांना शिवसेनेने एबी फॉर्म दिल्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.सध्या जवळपास दहा माजी नगरसेवक शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती असून, त्यामुळे पंचवटीसह अनेक प्रभागांत निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.