विद्यार्थी हे शिक्षकांच्या विचारांचे प्रतिबिंब
esakal January 01, 2026 02:45 AM

14600
मालवण ः ‘ताम्रपट’ पुरस्कार विजेते डॉ. प्रसाद वायंगणकर, प्रशांत खोबरेकर, इरावती पटवर्धन यांच्या सोबत उपस्थित मान्यवर.

विद्यार्थी हे शिक्षकांच्या विचारांचे प्रतिबिंब

डॉ. प्रसाद वायंगणकर ः मालवणात ताम्रपट वितरण सोहळा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० : वागणुकीमधून विद्यार्थ्यांच्या मनावर खोलवर धोरणात्मक बाबी उमटविण्याची शक्ती ज्याच्यात असते, तो खरा शिक्षक. शिक्षक हा शाळेची खरी संपत्ती आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनंत शिवाजी देसाई टोपीवाले यांनी ही संस्था निर्माण केली. त्यानंतर असंख्य व्यक्ती या संस्थेच्या देदीप्यमान इतिहासात सहभागी झाल्या. म्हणून विंदा करंदीकर यांच्या लोकप्रिय कवितेच्या ओळी मला आठवतात, ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता-घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे’ असे सांगत विद्यार्थ्यांनी दातृत्वातून शाळेसाठी आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन ताम्रपट विजेते डॉ. प्रसाद वायंगणकर यांनी आज येथे केले.

मालवण एज्युकेशन सोसायटीतर्फे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी येथील अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणाऱ्या (कै). डॉ. एस. एस. आजगावकर ताम्रपट वितरण सोहळा आज टोपीवाला हायस्कूलच्या रंगमंचावर झाला. यावर्षीचा (कै). डॉ. एस. एस. आजगावकर ताम्रपट टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ. प्रसाद वायंगणकर यांना, तर मानपत्र पुरस्कार प्रशांत खोबरेकर आणि इरावती पटवर्धन (पूर्वाश्रमीच्या सुजाता केतकर) यांना देऊन सन्मानित करण्यात आले. इरावती पटवर्धन यांनी प्रशालेच्या विकासासाठी १ लाख १ हजार रुपयांची देणगी यावेळी संस्थेकडे सुपूर्द केली. मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुदेश मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला संस्था सेक्रेटरी विजय कामत, प्राचार्य लक्ष्मण वळंजू, अॅड. अक्षय सामंत, शैलेश खांडाळेकर, चंद्रकांत सामंत, किशोर पटवर्धन, गुरुनाथ सामंत आदी उपस्थित होते.
चांगल्या कृतीचे फळ नेहमीच योग्यवेळी आणि योग्य पद्धतीने मिळत असते. डोंगराचा काही भाग हिरवागार करण्याची संकल्पना माझी असली, तरी मला अनेकांची हळूहळू साथ लाभत गेली. निसर्गाला सहानुभूतीची नव्हे, तर त्याला जपण्याची गरज आहे, असे मानपत्र विजेते प्रशांत खोबरेकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी लहान वयातच चांगले संस्कार आत्मसात केल्यास त्यांना यश मिळते, असे मानपत्र विजेत्या इरावती पटवर्धन यांनी सांगितले. शालेय शिक्षणाच्या काळात मिळालेल्या मूल्यांचा योग्य वापर करून आपण आपल्या भविष्याचे स्वप्न साकार करायचे आहे. शाळेचे हे क्षण आपल्या सर्वांसाठी एकत्रित पाहिलेल्या स्वप्नांचे, केलेल्या संघर्षाचे आणि यशाचे गमक आहे, असे संस्थाध्यक्ष मयेकर यांनी सांगितले.
प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात सर्वांगीण नैपुण्य पारितोषिक प्राप्त मुलगे रोहन साळुंखे, मुलगी-संस्कृती नाईक, ज्युनिअर कॉलेजचा सर्वोत्तम विद्यार्थी-अर्थ कुशे, विद्यार्थिनी-दीप्ती शिंदे, सर्वोत्तम वक्ता-रोशन साळुंखे, सर्वोत्तम खेळाडू-अनुष्का गावडे, सर्वोत्तम चित्रकार-रुद्र खानोलकर, ज्ञानज्योती मुखपृष्ठ स्पर्धा हायस्कूल गट विजेती-अनुष्का गावकर, कॉलेज गट विजेती-धनश्री सावंत, प्राथमिक शाळा सर्वोत्तम विद्यार्थी-रिषभ मयेकर, विद्यार्थिनी-आद्या आपटे, खेळाडू-रेचल बुतेलो, जय गणेश स्कूल सर्वोत्तम विद्यार्थिनी-भक्ती दामले, सर्वोत्तम कलाकार-मैथिली गावडे. मयुरा भिसे यांनी सूत्रसंचालन केले. वळंजू यांनी आभार मानले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.