जावळी तालुक्याचे उमदे नेतृत्व ः ज्ञानदेव रांजणे
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवून आंबेघर गावचे सुपुत्र ज्ञानदेव रांजणे यांनी राजकीय जीवनात गरुड भरारी घेतली. शिवसह्याद्री पतपेढीत व्यवस्थापक ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून निवडून येणे, इथपर्यंतचा अविश्वसनीय प्रवास करून त्यांनी स्वकर्तृत्वाने जावळी तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळवले. कायम जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घेऊन त्यासाठी कार्यरत राहणारे उमदे नेतृत्व ज्ञानदेव रांजणे (साहेब) यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त...
- सागर धनावडे (सर)
------------------------
सध्याची राजकीय स्थिती बिकट होत चालली असून, अशा स्थितीत कोणाचे तरी पाठबळ असल्याशिवाय राजकीय जीवनात झळाळी मिळत नाही. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या रांजणे साहेबांनी समाजाबाबत सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती असलेले दायित्व दाखवले. दुर्गम जावळी तालुक्यातील तरुणांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करत आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या मेढा नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा नगरपंचायत भाजपच्या ताब्यात घेण्यासाठी रांजणे साहेबांनी सूक्ष्म नियोजन करून जास्तीतजास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले. याची फलश्रुती म्हणून नगरपंचायतीवर भाजपने सत्ता मिळवली. जावळी तालुक्याच्या राजकारणात रांजणे यांचे महत्त्व वाढू लागले आहे. ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे सांगतील तेच धोरण व ते बांधतील ते तोरण’ यानुसार राजकीय जीवनात ते कार्यरत आहेत.
शिवसह्याद्री पतपेढीत आपल्या आयुष्याचा श्रीगणेशा करताना कठोर परिश्रम, जिद्द व स्वप्नपूर्तीसाठी घेतलेली अविरत धडपड यामुळे त्यांना जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळत आहे. शिवसह्याद्री परिवाराचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वर (भाई) वांगडे यांच्या परीसस्पर्शाने रांजणे साहेबांनी त्यांचे सोने झाले. जिल्ह्यातील बलाढ्य नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभव करून राज्याच्या राजकारणात ते हिरो झाले. छोट्याशा आंबेघर गावातील कोण हे ज्ञानदेव रांजणे असा सवाल राजकीय क्षेत्रातील धुरीण विचारू लागले. चुरशीच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रांजणे यांना मिळालेला हा विजय त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नवा आयाम मिळवून देणारा आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून तालुक्यातील विकास सेवा सोसायटी स्वयंपूर्ण करण्यासाठी व सोसायट्या आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी रांजणे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करत आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी श्री. रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांना उमेदवारी दिली. राजकारणाचा फारसा अभ्यास व अंदाज नसताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या करिष्म्यामुळे व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमातून अर्चना रांजणे यांचा समोर मातब्बर प्रतिस्पर्धी असताना देखील मोठ्या मताधिक्याने विजय झाला.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची सावली बनून जावळी तालुक्यात काम करत असताना श्री. रांजणे यांनी तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे हे राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्याने निवडून आले. यात जावळी तालुक्याचा, तसेच कुसुंबी गटाचा मोठा वाटा आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी राजकीय क्षेत्रात विश्वास दाखवून संधी दिली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी कार्यरत राहणार असून, माझ्या जावळी तालुक्यातील जनतेसाठी विकासपर्व हाती घेतले. मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विकासकामांच्या बाबतीत रोल मॉडेल करण्यासाठी कायम कार्यमग्न राहणार असल्याचे श्री. रांजणे आवर्जून नमूद करतात.
आपल्या राजकीय व शैक्षणिक वाटचालीत आपल्या कुटुंबाचे योगदान हे मोलाचे असल्याचे ते सांगतात. शैक्षणिक, सहकार, क्रीडा क्षेत्रात रांजणे कुटुंब सातत्याने योगदान देत आहे. जावळी तालुक्यातील ५४ गावांसाठी महत्त्वाचा असलेला बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत असून, या कामासाठी ही रांजणे सातत्याने यासाठी प्रयत्नशील आहेत.
माझ्या दुर्गम व डोंगराळ तालुक्यातील युवकांना रोजगार, गावांना पक्के डांबरी रस्ते, पाणीपुरवठा योजना, विकासकामे मार्गी लागली पाहिजेत, यासाठी श्री. रांजणे सातत्याने मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत संवाद राखून काम करत आहेत. प्रत्येक बिकट परिस्थितीत शासनाच्या मदतीची वाट न पाहता प्रसंगी पदरमोड करून जनतेला दिलासा देण्याचे काम रांजणे परिवाराने नेहमीच केले आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रांजणे यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवली असून, भविष्यात रांजणे यांना मोठी राजकीय जबाबदारी मिळो व जावळी तालुक्याच्या विकासासाठी त्यांची राजकीय कारकीर्द यशस्वी ठरो, हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना....
- शब्दांकन ः संदीप गाडवे, केळघर.
---------------------------