नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या देशात Gen Z रस्त्यावर; महागाई, बेरोजगारीने तरुणाईच्या संतापाचा कडेलोट
Tv9 Marathi January 02, 2026 02:45 PM

Gen Z Protest In Iran: नेपाळनंतर जगातील अनेक देशात तरुणाईने सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचले आहे. अनेक तानाशाहांना आणि सत्तेवर कित्येक वर्षांपासून मांड ठोकणाऱ्यांना देश सोडून पळ काढवा लागला आहे. आता अशीच परिस्थिती मध्य-पूर्वेतील इराण या देशात उद्भवली. अयातुल्ला खोमेनी यांची मजबूत पकड असलेल्या या देशात गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या स्वातंत्र्याचे दमन होत आहे. त्याविरोधात या महिलांना अनेकदा आवाज उठवला आणि त्यात अनेक महिलांचे बळी गेले आहेत. आता देशाची आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याने त्याविरोधात तरुणाई, Gen Z रस्त्यावर उतरली आहे. गुरुवारी परिस्थिती हाताबाहेर गेली. ग्रामीण भागातही हिंसेचे लोण पसरले. यामध्ये आतापर्यंत सहा नागरिकांचा बळी गेला आहे. तर शेकडो जण गंभीर जखमी झाले आहेत. 2022 नंतर इराणमध्ये पहिल्यांदा इतके मोठे हिंसक आंदोलन झाले आहे. इराणची तीन शहरं या आंदोलनामुळे जळत आहेत. तरुणाई आणि नागरिक प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरली आहेत. हिंसेचे लोण आता देशातील इतर ठिकाणी सुद्धा पसरले आहे.

6 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

महसा अमिनी हिच्या मृत्यूनंतर चार वर्षांपूर्वी इराणमध्ये हिंसक आंदोलन झाले होते. तेव्हापासून इराणच्या सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांच्या मनात संताप आहे. लोरेस्तान राज्यात सर्वाधिक हिंसक आंदोलन होत आहेत. सोशल मीडियावर या आंदोलनाची भयावह चित्रं आणि व्हिडिओ दिसत आहेत. यामध्ये गोळीबाराचे आवाज, विविध वाहनांना आग लावल्याचे दिसून येत आहे. तरुणांच्या टोळ्या रस्त्यावर खोमेनीविरोधात घोषणाबाजी करताना दिसून येत आहे.याप्रकरणी सहा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे. अर्थात सरकारी वृत्तसंस्था या घटनांची तपशीलवार माहिती देताना दिसत नाहीत. सोशल मीडियातूनच याविषयीची माहिती समोर येत आहे.

100 हून अधिक पिस्तूलं जप्त

सरकारी टीव्हीने केलेल्या दाव्यानुसार अनेकांची धरपकड करण्यात आली आहे. राजेशाही समर्थक आणि युरोपाच्या बाजूने झुकलेल्या लोकांमध्ये हिंसक वाद झाले. अनेक ठिकाणी दोन्ही गट भिडले. त्यातील अनेकांना अटक करण्यात आली. या लोकांकडून 100 हून अधिक पिस्तूलं जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यातील अनेकांना सरकारने तेहरान बाहेरील तुरुंगात डांबण्याचे आदेश दिल्याचे समजते. या आंदोलनात केवळ महागाई, बेरोजगारीच नाही तर खोमेनी यांच्या धार्मिक कट्टरतावादाविरोधातही घोषणा बाजी करण्यात आली.

इराणच्या चलनात मोठी घसरण

गेल्या काही दिवसांपासून इराणचे चलन रियालमध्ये झपाट्याने घसरण होत आहे. एक डॉलरची किंमत जवळपास 14 लाख रियालपर्यंत पोहचली आहे. राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याचे संकेत दिले आहे. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था नाजूक स्थितीतून जात असल्याचे मान्य केले आहे. आर्थिक महागाई, बेरोजगारी आणि नागरिकांवरील कडक नियमांविरोधात नागरीक रस्त्यावर उतरले आहेत. लोकांचा आवाज सतत दाबण्याचा प्रयत्न होत असल्याने त्याचा भडका उडाला आहे. हिंसेचे लोण अधिक भडकल्यास इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या अडचणी वाढू शकतात, असे मानले जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.