rat2p9.jpg-
15096
रत्नागिरीः अभ्युद्ययनगर परिसरात वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात शेळी बांधलेली आहे.
----------
कॅमेरे, पिंजऱ्यांना बिबट्याची हुलकावणी
रत्नागिरी शहरातील अभ्युदयनगर, नरहर वसाहतीत दर्शन; जंगलात परतला असण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : रत्नागिरी शहरातील अभ्युदयनगर आणि नरहर वसाहत, विश्वनगर परिसरात दहा दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेनंतर सतर्क झालेल्या वनविभागाने तातडीने ट्रॅप कॅमेरे आणि चार ठिकाणी पिंजरे लावले; परंतु दहा दिवस झाले तरीही बिबट्या कॅमेरात ट्रॅप झालेला नाही. शहराच्या आजुबाजूच्या जंगलपरिसरातही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गस्त घातली. त्यामुळे शहरात आलेला बिबट्या जंगलभागात परतला असावा, असा अंदाज वनविभागाकडून वर्तवला जात आहे.
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरातील अभ्युदयनगर येथील नरहर वसाहतीमधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये बिबट्या आढळून आला. नरहर वसाहतीमधील रस्ता ओलांडून तो निघून गेलेला त्यात दिसत होता. मध्यरात्रीच्या सुमारास मानवीवस्तीत खुलेआम वावरताना दिसल्यानंतर भितीचे वातावरण होते. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी वनविभागाची बैठक घेतली आणि त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या. सीसीटीव्हीत दिसलेला बिबट्या असल्याची खात्री झाल्यानंतर वनविभागाने तातडीने चार विविध ठिकाणी पिंजरे लावले. बिबट्यासाठी पिंजऱ्यामध्ये शेळी ठेवण्यात आली होती तसेच वनविभागाची पथकेही या परिसरावर बारीक लक्ष ठेवून होते. बिबट्या येण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही असल्यामुळे माग काढणे सोपे झाले होते; परंतु त्या कॅमेरामध्ये बिबट्या ट्रॅप झालेला नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले तसेच त्या पिंजऱ्यात ठेवलेल्या शेळीचा बळीही गेला नाही.
दरम्यान, बिबट्या खाद्याच्या शोधात फिरत शहरात आला असावा आणि तो कालांतराने निघून गेला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. अभ्युद्यनगर किंवा त्या परिसरातील लोकवस्ती दाटीवाटीची नाही. जंगलाकडे जाण्यासाठीचा मार्ग खुला असल्यामुळे तो बिबट्या जंगलात परत गेला असावा, असा तर्क काढण्यात आला आहे.
कोट
रत्नागिरी शहरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट दिसल्यानंतर त्याचा माग काढण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. आतापर्यंत त्यामध्ये बिबट्या दिसलेला नाही.
- प्रकाश सुतार, प्रादेशिक वनाधिकारी
चौकट
शहराजवळील गावांमध्ये दर्शन
दरम्यान, रत्नागिरी शहरातील कॅमेऱ्यात बिबट्या मिळाला नसला तरी शहराजवळील पोमेंडीखुर्द, गुरूमळी, नारायणमळी येथे बिबट्याचे दर्शन होत आहे. गुरूमळीतील आंबाबागांमध्ये तो दिसत असून, पोमेंडीतील एका वासरावरही रात्री त्याने हल्ला केला; मात्र याबाबत वनविभाग सुस्त असल्याचे दिसून येत आहे.
चौकट
खेडशी, फणसवळेतही मुक्त संचार
रत्नागिरी तालुक्यातील खेडशी, फणसवळे परिसरातही बिबट्याचा संचार सुरू आहे. येथील ग्रामस्थ सायंकाळी सातनंतर एकटे बाहेर पडत नाहीत. खेडशीफाट्यावरून कोणाला जायचे असल्यास ते दुचाकीऐवजी चारचाकीचा वापर करत आहेत. ३१ डिसेंबरलाही रात्री सेलिब्रेशन न करता सायंकाळी सेलिब्रेशन करून रात्री नऊनंतर घरी राहणेच येथील ग्रामस्थांनी पसंत केले आहे; मात्र याकडेही वनविभागाने गांभीर्याने पाहिलेले नाही.