उसाच्या चिपाडात आम्ही कसं जगतो हे रिल्सच्या माध्यमातून जगाला सांगणाऱ्या एका ऊसतोड मजुराचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील रीलस्टार गणेश डोंगरे यांचा ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर उलटल्याने जागीच मृत्यू झाला. लातूरमधील साखर कारखान्यावर ही धक्कादायक घटना घडली. हृदयद्रावक बाब म्हणजे ज्यावेळी हा अपघात घडला, तेव्हा गणेश यांची पत्नी अश्विनी फेसबुकवर लाईव्ह करत होत्या. डोळ्यादेखत पतीचा काळ बनून आलेल्या ट्रॉलीखाली मृत्यू झाल्याचे पाहून त्यांच्या पत्नीने टाहो फोडला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळव्यक्त केली आहे.
नेमकं काय घडलं?वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी (सोन्नाखोटा) येथील गणेश डोंगरे यांच्याकडे जेमतेम एक एकर शेती होती. वृद्ध आई-वडील, पत्नी आणि तीन लहान मुली अशा मोठ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. गरिबीशी दोन हात करण्यासाठी हे दाम्पत्य दरवर्षी ऊसतोडणीसाठी बाहेर पडायचे. कष्ट करत असतानाच ऊसतोड मजुरांचे खडतर आयुष्य, त्यांचा संघर्ष आणि त्यातही शोधलेला आनंद गणेश आणि अश्विनी रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करायचे. अल्पावधीतच हे दाम्पत्य सोशल मीडियावर लोकप्रिय झाले होते.
दोन दिवसांपूर्वी गणेश आणि अश्विनी लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्यावर ऊस घेऊन गेले होते. कारखान्यावर वजनासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आपला नंबर येण्याची प्रतीक्षा करत असताना अश्विनी यांनी फेसबुक लाईव्ह सुरू केले. कारखान्यावर लवकर गाडी रिकामी होत नाही, इथेच थांबावं लागतंय, गाडी नसेल तर दंड लागतो, असे त्या प्रेक्षकांना सांगत होत्या.
हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधार कायमचा हिरावलाअश्विनी फेसबुकवर बोलत असतानाच, शेजारी उभा असलेला एक ट्रॅक्टर अचानक गणेश यांच्या अंगावर उलटला. काही कळण्याच्या आतच गणेश ट्रॉलीखाली गाडले गेले. यावेळी अश्विनी यांच्या तोंडातून बयो… अशी किंकाळी बाहेर पडली आणि होत्याचे नव्हते झाले. अवघ्या दोन मिनिटांच्या त्या व्हिडीओमध्ये एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला.
गणेश यांच्या निधनामुळे डोंगरे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यांना तीन लहान मुली आहेत. कुटुंबात कमावणारा तो एकमेव आधार होता. कारखान्याच्या आवारात रस्त्याची दुरवस्था आणि नियोजनाचा अभाव असल्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
मदतीसाठी सोशल मीडियावरून आवाहनहा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे, अजितदादांनी या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारावे, त्यांना घर बांधून द्यावे आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी बीड जिल्ह्यातील नागरिकांकडून केली जात आहे. तसेच, कारखान्याने पीडित कुटुंबाला किमान २५ लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.