टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही या मालिकेत खेळणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना या मालिकेची प्रतिक्षा आहे. तसेच नियमित कर्णधार शुबमन गिल याचं दुखापतीनंतर पुनरागमन झालं आहे. उपकर्णधार आणि मुंबईकर फलंदाज श्रेयस यालाही निवड समितीने या एकदिवसीय मालिकेसाठी संधी दिली आहे. मात्र श्रेयस खेळणार की नाही? हे त्याच्या फिटनेसवरुन अवलंबून असल्याचं बीसीसीआयने नमूद केलं होतं. श्रेयस फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तरच त्याला खेळता येईल, असं बीसीसीआयने न्यूझीलंड विरुद्धचा संघ जाहीर केल्यांनतर प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं होतं. आता श्रेयसच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. श्रेयसला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कॅच घेताना दुखापत झाली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस फिटनेस टेस्टमध्ये पास झाला आहे. बंगळुरुस्थित बीसीसीआय सीओईकडून श्रेयस फिट असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता श्रेयसला न्यूझीलंड विरुद्ध खेळता येणार आहे. मात्र याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.