टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून भारत-श्रीलंकेकडे यजमानपद आहे. या स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना संघांची घोषणा केली जात आहे. भारताने मागच्या महिन्यातच संघ जाहीर केला होता. त्यानंतर एकापाठोपाठ एक संघ जाहीर होताना दिसत आहेत. आता नेपाळने आपला संघ जाहीर केला आहे. नेपाळने 15 सदस्यीत संघाची घोषणा केली आहे. या संघात अनुभवी खेळाडू आणि तरुण प्रतिभेची सांगड घालण्यात आली आहे. नेपाळने रोहित पौडेलकडे टी20 वर्ल्डकप संघाची धुरा सोपवली आहे. रोहित हा एक अनुभवी फलंदाज आहे आणि त्याने नेपाळला अनेक महत्त्वाचे सामने जिंकून दिले आहेत. तर दीपेंद्र सिंह ऐरी हा उपकर्णधार असणार आहे. तर संदीप लामिछाने याचीही संघात नियुक्ती करण्यात आली आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडू संदीप लामिछानेलाही संघात स्थान दिलं असून फिरकी विभागाचे नेतृत्व करणार आहे. इतकंच काय तर फिरकीपटू ललित राजबंशी आणि बसीर अहमद यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. दीपेंद्रसह, गुलशन झा, आरिफ शेख आणि सोमपाल कामी यांना अष्टपैलू संघात समाविष्ट केलं आहे.
रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग ऐरी (उपकर्णधार), संदीप लामिछाने, कुशल भुरटेल, आसिफ शेख, संदीप जोरा, आरिफ शेख, बशीर अहमद, सोमपाल कामी, करण केसी, नंदन यादव, गुलशन झा, ललित राजबंशी, शेर मल्ला आणि लोकेश बाम.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नेपाळचा संघ क गटात आहे. या गटात बांग्लादेश, इंग्लंड, इटली आणि वेस्ट इंडिज या संघांचा समावेश आहे. साखळी फेरीत नेपाळचा संघ एकूण चार सामने खेळणार आहे. नेपाळचा पहिला सामना 8 फेब्रुवारीला इंग्लंडशी होणार आहे. 12 फेब्रुवारीला इटली, 15 फेब्रुवारीला वेस्ट इंडिज, 17 फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. साखळी फेरीत नेपाळने चांगली कामगिरी केली तर सुपर 8 फेरीत स्थान मिळणार आहे.