पावती न फाडता पैसे घेऊन गाड्या सोडा, संध्याकाळी भेटा; वरिष्ठांकडून सतत त्रास, ट्राफिक पोलिसाने चिठ्ठी लिहून ठेवली अन्...
esakal January 12, 2026 08:45 AM

पुण्यात वाहतूक पोलिसाने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली असून तो बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे. माधव केरबा डोके असं ३६ वर्षीय वाहतूक पोलिसाचं नाव आहे. वरिष्ठांकडून पावती न फाडता वाहनं सोडण्यासाठी दबाव टाकला जात होता असा धक्कादायक आरोपही चिठ्ठीत माधव डोके यांनी केलाय. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माधव डोके हे तळेगाव दाभाडे इथं वाहतूक विभागात कार्यरत आहेत. त्यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळलो असल्याचं एका चिठ्ठीत लिहिलंय. तसंच वरिष्ठांकडून सतत मानसिक त्रास दिला जात होता असंही त्यात म्हटलं आहे.

Pune : पूजा खेडकरच्या घरी चोरी, ८ दिवसांपूर्वी घरकामाला आलेल्या नेपाळी कामगाराने सगळ्यांचे मोबाईल नेले चोरून

कर्तव्यावर असताना पावती न फाडता गाड्या सोड आणि संध्याकाळी येऊन भेट असं वरिष्ठ सांगायचे. जेव्हा मी नाही म्हणायचो तेव्हा माझा सतत मानसिक छळ केला जातोय. तळेगाव दाभाडे स्टेशन चौकात नो एन्ट्रीत २०० रुपये घेऊन अधिकाऱ्यांच्या गाडीच्या चालकानं गाड्या सोडल्या. एपीआय लोंढेंपुढे त्यांना हजर केलं असता ठीक आहे म्हणून पैसे घेऊन गाड्या सोडल्याचं चिठ्ठीत म्हटलं आहे.

एपीआय लोंढे यांनी संबंधितांवर कारवाई ऐवजी मलाच शिवीगाळ केली. मला हा मनस्ताप सहन न झाल्यानं आत्महत्या करतोय असं माधव डोके यांनी चिठ्ठीत म्हटलंय. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांना माधव डोके यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. दरम्यान, माधव डोके यांचा ठावठिकाणी लागत नसल्यानं कुटुंबीय चिंतेत आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.