पिंपरी, ता. ११ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर कैलास कदम यांनी ऐनवेळी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत बऱ्याच घडामोडी घडल्या. अशा परिस्थितीत ४५ उमेदवार काँग्रेसकडून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस पक्षाच्या उभारणीची नांदी, की पुनरावृत्ती ठरणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सध्या शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (दोन्ही पक्ष एकत्र) वर्चस्वामुळे काँग्रेसला आपली ताकद वाढवण्यासाठी मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आजही देशाच्या कानाकोपऱ्यात पक्षाचे कार्यकर्ते आहेत. अपयशानंतरही प्रतिकूल राहिलेल्या लोकसभा, विधानसभा अशा निवडणुकीत काँग्रेसचा जो जनाधार होता तो कायम राहिल्याचे चित्र होते. दरम्यान, शहर पातळीवर पाहता २००७ मध्ये काँग्रेसचा महापालिका निवडणुकीत पराभव झाला. शहरात एकही उमेदवार निवडून आला नाही. नव्या मतदारांना आकर्षित करण्यात हा पक्ष आणि त्याचे नेतृत्व अपयशी ठरले, अशी चर्चा त्यावेळी राजकीय जाणकारांनी केली. पण, त्यानंतरही पक्ष पातळीवर फार काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या नाहीत. अथवा, कार्यकर्ते आणि पक्ष संघटनेला बळ देण्यासाठी वरिष्ठांकडून हवे तसे लक्ष पुरवले गेले नाही. त्यामुळे शहर पातळीवर पक्षाला हवे तसे यश मिळत नाही, ही वस्तूस्थिती आहे.
उमेदवारांची जमवाजमव
ऐनवेळी झालेली गटबाजी, असमन्वय, त्यातून निर्माण झालेल्या संघटनात्मक अडचणी आणि उमेदवारांची जमवाजमव आणि आता निवडणूक काळात होणारे नियोजन यावर एकंदरीत काँग्रेसचे भवितव्य अवलंबून असणार आहे. मात्र, नेत्याअभावी कार्यकर्ते आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलेली ही निवडणूक काय निकाल देते, हे येणाऱ्या काळात मतदारच ठरवतील. महाविकास आघाडी शेवटी तुटल्याने झालेला अपेक्षाभंग या पार्श्वभूमीवर स्वतंत्र लढायचा निर्णय अंतिमतः काँग्रेसकडून करण्यात आला.
...यांना मिळाली संधी
काँग्रेसने यावेळी महापालिका निवडणुकीत डॉक्टर, वकील, अभियंते, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, सर्वसामान्य घरातील उमेदवार ज्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशांना संधी दिली आहे. तर, काही उमेदवार उद्योजक आहेत. काही गृहिणी आहेत; तर काही झोपडपट्टीतील कार्यकर्ते आहेत.
काँग्रेस खाते उघडणार?
या निवडणुकीत काँग्रेस पक्ष खाते उघडणार आणि नव्या दमाने नवी वाटचाल सुरू करणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही नगरसेवक निवडून आले, तर हे संपूर्ण श्रेय निष्ठावान कार्यकर्ते आणि प्रदेश काँग्रेस कमिटीने केलेल्या ऐनवेळच्या निवडणूक हाताळणीच्या नियोजनात असेल.
PNE26V84482