समाजाचा अपमान सहन करणार नाही
मीनाक्षी शिंदेंच्या कथित ऑडिओ क्लिपवरून सुरेश म्हात्रे आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या एका कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वातावरण तापले असून, खासदार सुरेश म्हात्रे यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. राजकीय टीका आम्ही समजू शकतो; मात्र समाजाचा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही, अशा शब्दांत खासदारांनी आपला निषेध नोंदवला. याप्रकरणी शुक्रवारी (ता. ९) त्यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये मीनाक्षी शिंदे यांनी एका विशिष्ट समाजाबद्दल आणि व्यक्तीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप आहे. यातील चर्चा लज्जास्पद असून त्यामुळे समाजभावना दुखावल्या गेल्याचे खासदार म्हात्रे यांनी म्हटले आहे.
पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार म्हात्रे म्हणाले, की निवडणूक आणि आचारसंहितेचा काळ असल्याने आम्ही कायद्याचा सन्मान राखत आहोत. अन्यथा, या अपमानाचा निषेध करण्यासाठी आतापर्यंत लाख-दीड लाख लोकांचा मोर्चा निघाला असता. एका जबाबदार पदावर राहिलेल्या महिलेने दुसऱ्या महिलेबद्दल असे बोलणे अशोभनीय आहे. म्हात्रे यांनी स्पष्ट केले, की हा प्रश्न केवळ ठाण्यापुरता मर्यादित नसून जिथे जिथे समाजाचे लोक राहतात, त्या सर्व ठिकाणी गुन्हे दाखल केले जातील. प्रशासनाने यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.