नारायणगाव, ता. ११ : ‘‘भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी जमिनीची आरोग्य तपासणी करावी. कांदा, टोमॅटो पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन फार महत्त्वाचे आहे. पिकाच्या गरजेनुसार, वाढीनुसार, तत्कालीन हवामान परिस्थितीनुसार पाणी देणे गरजेचे आहे. कीड- रोग नियंत्रणासाठी भौतिक, जैविक व रासायनिक या पद्धती एकत्रितपणे अंगीकारणे महत्त्वाचे आहे. अॅझोटोबॅक्टर, रायझोबियम, पी.एस.बी., के.एम.बी. या जैविक खतांचा वापर करावा. सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करावा,’’ असा सल्ला नाशिक येथील डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक व संचालक डॉ. सुनील दिंडे यांनी शेतकऱ्यांना दिला.
कृषी प्रदर्शनानिमित्त नारायणगाव (ता. जुन्नर) कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या पीक परिसंवादात बदलत्या हवामानातील भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन याविषयी डॉ. दिंडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उद्यानविद्या विषयतज्ञ भरत टेमकर म्हणाले, ‘‘बदलत्या वातावरणाचा कांदा व टोमॅटो पिकावर दुष्परिणाम दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा जसे गादीवाफा, ठिबक सिंचन, मल्चिंग, कव्हर, प्रोटेक्शन पेपर यांचा वापर करावा. कृषी विज्ञान केंद्राच्या प्रायोगिक प्रक्षेत्रावर लागवड केलेल्या कांदा, टोमॅटो पिकाची पाहणी करून पीक व्यवस्थापन करावे.’’
यावेळी येडगाव येथील यशस्वी टोमॅटो उत्पादक बाळकृष्ण बांगर यांनी टोमॅटोच्या भरघोस उत्पादनाविषयी केलेल्या प्रयोगांची शेतकऱ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त प्रकाश पाटे होते. यावेळी उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, संचालक एकनाथ शेटे, ऋषिकेश मेहेर आदी उपस्थित होते. कृषी विस्तार विषयतज्ञ राहुल घाडगे यांनी आभार मानले प्रदर्शन केले.
7733