Maharashtra Politics: माजी आमदार सपकाळांनंतर आणखी एका निष्ठावंत शिलेदाराने सोडली साथ, उद्धव ठाकरेंना पुन्हा एक धक्का
Saam TV January 12, 2026 01:45 PM
  • निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असताना ठाकरे गटात मोठी गळती

  • माजी आमदार आणि माजी नगरसेवकांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश

  • उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

महानगरपालिका निवडणुका अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र अजून ठाकरे गटातील गळती थांबली नाहीये. मुंबईसह अनेक महानगरपालिकांमध्ये ठाकरे गट आणि मनसेची सत्ता येण्यासाठी उद्धव-राज ठाकरेंनी सभांचा धडाका लावलाय. कार्यकर्त्यांना भेटून त्यांचा उत्साह वाढवून पक्षाचा प्रचार जोमाने करत आहेत.

बंधू राज ठाकरे सोबत असल्यानं त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. शंभर हत्तीचं बळ मिळालं असल्याचं दाखवत असले तरी उद्धव ठाकरेंना एकामागून एक धक्के मिळत आहेत. माज आमदार सपकाळ हे शिवसेनेत जात नाही तोच दुसऱ्या एका निष्ठावंत शिलेदारानं उद्धव ठाकरेंची साथ सोडलीय.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

ऐन निवडणुकीच्यातोंडावर उद्धव ठाकरे गटाला एका दिवसात दोन मोठे धक्के बसलेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसलाय. गोरेगाव येथील शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावंत माजी नगरसेवक दिलीप शिंदेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा राजीनामा दिलाय.

Maharashtra Politics: शिवसेनेचा दे धक्का, संदीप धुरींनंतर आणखी एका शिलेदारानं सोडली राज ठाकरेंची साथ

दिलीप शिंदे हे गोरेगावमधून सलग चार वेळा नगरसेवक होते. यावेळीही ते निवडणूक लढण्यास इच्छुक होते. पण मनसे-ठाकरे गट युतीमुळे त्यांना संधी मिळाली नाही. ज्या वॉर्डमधून दिलीप शिंदे निवडून येत होते, त्या वॉर्डाची जागा मनसेच्या पारड्यात गेलीय. तेव्हापासून दिलीप शिंदे पक्षात नाराज होते. आता मतदानाला पाच दिवस उरले असताना दिलीप शिंदे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर दिलीप शिंदे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

सपकाळ यांनी राजीनामा का दिला?

शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी आज उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदेयांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मी छातीवर दगड ठेवून निर्णय घेतल्याचं दगडू सकपाळ म्हणाले. दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ या शिवडी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 203 मधून निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. दरम्यान दोन दिवसांपूर्वी दगडू सपकाळ यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी त्यांनी आपण म्हातारे झालो असल्यामुळे पक्षाला आता आपली गरज नसल्याची खंत व्यक्त केली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.