भिवंडी, ता. ११ (वार्ताहर) : भादवड-टेमघर हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे. प्रभाग क्रमांक १३ आणि १५ मध्ये त्यांनी प्रचाराची आघाडी घेतली आहे. ४० वर्षांपासून अबाधित राहिलेला हा बालेकिल्ला यंदाही कायम राखण्याचा प्रयत्न असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख मदनबुवा नाईक यांनी व्यक्त केला आहे.
भिवंडी-निजामपूर महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सर्वच पक्ष प्रचारात गुंतले आहेत. अशा परिस्थितीत भादवड व टेमघरच्या
प्रभाग क्रमांक १३ व १५ मध्ये शिवसेनेकडून व्यापक आणि प्रभावी प्रचार मोहीम राबवली जात आहे. भादवड नाका येथे या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. या विभागाचे चार दशके प्रतिनिधित्व करणारे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक; तसेच भिवंडी लोकसभा संपर्क संघटक मदनबुवा नाईक यांच्या हस्ते रॅलीला सुरुवात झाली. या वेळी नाईक म्हणाले, या प्रभागाचे तब्बल ४० वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, यावेळी पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनुसार मी उमेदवार म्हणून निवडणुकीत न उतरता, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी पुढे सांगितले, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून, त्याच विकासाच्या बळावर महायुतीला निश्चित यश मिळेल. भादवड येथे शिवसेना उमेदवार बाळाराम चौधरी, अस्मिता नाईक, सुचिता म्हात्रे आणि मनीषा दांडेकर यांच्या प्रचारासाठी पदयात्रा काढण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील, उपनेते व माजी आमदार रूपेश म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.