टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात 2026 वर्षात अप्रतिम सुरुवात केली. भारताने नववर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या आणि एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. भारताने न्यूझीलंड विरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली. भारताने रविवारी 11 जानेवारीला झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. शुबमन आणि श्रेयस अय्यर या दोघांनी दुखापतीनंतर कडक कमबॅक केलं. कर्णधार शुबमन गिल याने या सामन्यात 255 धावांचा पाठलाग करताना अर्धशतक झळकावलं. उपकर्णधार श्रेयस अय्यर याने 49 धावांचं योगदान दिलं.
तर अनुभवी फलंदाज विराट कोहली याने सर्वाधिक धावा केल्या. विराटचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. विराटने 93 धावा केल्या. केएल राहुल याने 29 धावा जोडल्या. तर हर्षित राणा याने बॉलिंगसह बॅटिंगनेही निर्णायक योगदान दिलं. हर्षितने 2 विकेट्स मिळवल्या. तसेच निर्णायक क्षणी 29 धावांची खेळी करत भारताच्या विजयात अमूल्य असं योगदान दिलं. त्यानंतर आता उभयसंघातील दुसरा सामना हा बुधवारी 14 जानेवारीला होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं निश्चित आहे.
साधारणपणे विजयी संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करत नाहीत, असा अलिखित नियम आहे. मात्र त्यानंतरही टीम मॅनेजमेंटला न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी नाईलाजाने बदल करावा लागणार आहे. भारताचा ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला पहिल्या सामन्यात बॉलिंग करताना दुखापत झाली. सुंदर आणि टीम इंडियाला ही दुखापत महागात पडली. सुदंरला या दुखापतीमुळे उर्वरित 2 सामन्यांमधून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे सुंदरच्या दुखापतीमुळे टीम मॅनेजमेंटनला प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करावा लागणार आहे.
दरम्यान वॉशिंग्टन सुंदर याला बाहेर व्हावं लागल्याने त्याच्या जागी उर्वरित मालिकेतील 2 सामन्यांसाठी आयुष बडोनी याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच त्याआधी विकेटकीपर ऋषभ पंत याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलंय. पंतच्या जागी या मालिकेत ध्रुव जुरेल याचा समावेश करण्यात आला आहे. आयुष आणि ध्रुवपैकी कुणाचंही एकदिवसीय पदार्पण झालेलं नाही. त्यामुळे टीम मॅनेजमेंट या दोघांपैकी कुणा एकाचा समावेश करणार की दुसऱ्याला संधी देणार? यासाठी टॉसपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.