भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना होणार आहे. या मालिकेत दोन खेळाडू दुखापतीमुळे बाद झाले आहेत. दुसरीकडे, टी20 मालिकेपूर्वी स्टार फलंदाजही सुरुवातीच्या तीन सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आता न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. कारण दोन वनडे सामन्यांना मुकलेल्या अष्टपैलू खेळाडू आता न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी ताण वाढला आहे. हा अष्टपैलू खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून वॉशिंग्टन सुंदर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याला दुखापत झाली आणि वनडे मालिकेला मुकला होता. आता न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे.
बीसीसीआयने 12 जानेवारीला आपल्या निवेदनात स्पष्ट केलं की, वॉशिंग्टन सुंदरला वनडे मालिकेतून वगळलं आहे. पण त्याची दुखापत गंभीर असल्याने 21 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या टी20 मालिकेत भाग घेणार नाही. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. कारण वॉशिंग्टन सुंदरची निवड टी20 वर्ल्डकप स्पर्धेत केली आहे. फिरकीसोबत आक्रमक खेळी करण्यास वॉशिंग्टन सुंदरला ओळखलं जातं. जर त्याला टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही खेळला नाही तर त्याची जागा भरून काढण्याचं मोठं आव्हान असेल. कारण अष्टपैलू खेळाडूची जागा भरून काढणं वाटतं तितकं सोपं नाही. भारत टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. वनडे मालिकेत वॉशिंग्टनच्या जागी आयुष बदोनीची निवड केली. पण टी20 मालिकेत कोण जागा घेणार? हे अद्याप निश्चित झालेले नाही.
टीम इंडियाला आधीच दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला साइड स्ट्रेनमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडावं लागलं. तिलक वर्माला कंबरेच्या दुखापतीमुळे पहिल्या तीन टी20 सामन्यांना मुकावं लागलं आहे. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून त्यातून लवकर बरा झाला तर ठीक आहे. अन्यथा त्याच्या जागेही दुसऱ्या खेळाडूची शोधाशोध करावी लागेल.