पांढऱ्या कांद्याच्या काढणीला यंदा विलंब
फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत बाजारात दाखल होण्याची शक्यता
अलिबाग, ता. १९ (वार्ताहर) : अलिबाग तालुक्यात पिकविला जाणाऱ्या पांढऱ्या कांद्याला चव, औषधी गुणधर्म आणि टिकाऊपणामुळे दरवर्षी राज्यभर मोठ्या प्रमाणात मागणी असते. साधारण जानेवारीच्या मध्यापासून या कांद्याची काढणी सुरू होऊन फेब्रुवारीपर्यंत तो बाजारात विक्रीसाठी दाखल होत असतो. मात्र यावर्षी तालुक्यातील कार्ले, खंडाळा तसेच आसपासच्या परिसरात उत्पादित होणाऱ्या पांढऱ्या कांद्याच्या काढणीला विलंब झाल्याने तो उशिराने दाखल होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
अलिबाग तालुक्यातील पांढऱ्या कांद्याला राज्यभरातून विशेष मागणी असते. कार्ले, खंडाळा, वाडगाव या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर या कांद्याची लागवड केली जाते. मात्र यंदा पावसाने अपेक्षेपेक्षा जास्त काळ मुक्काम केल्याने शेतीच्या सर्वच कामांवर परिणाम झाला. विशेषतः खरीप हंगामातील कापणी उशिरा झाल्याने कांदा लागवडीचा नियोजित कालावधी पुढे ढकलावा लागला. सामान्यतः खरीप पिकांची कापणी पूर्ण झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत कांदा लागवड केली जाते. दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी कांदा लागवड यंदा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात करावी लागली. त्यामुळे कांद्याची लागवड सुमारे १५ दिवस उशिरा झाली. या विलंबाचा थेट परिणाम कांद्याच्या वाढीवर तसेच काढणीच्या वेळापत्रकावर झाला आहे. शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, यंदा २६ जानेवारीनंतरच कांदा काढणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. काढणीनंतर कांद्याची माळी तयार करणे, वाळवण, प्रतवारी तसेच बाजारात पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे जानेवारीच्या अखेरीस काढणी सुरू झाली तरी प्रत्यक्षात हा पांढरा कांदा फेब्रुवारी महिन्यातच बाजारात उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
.................
दर चांगला मिळण्याची शक्यता
काढणीला झालेल्या विलंबामुळे उत्पादनावर फारसा परिणाम होणार नसला, तरी बाजारातील आवक उशिरा होणार असल्याने सुरुवातीच्या काळात कांद्याला चांगले दर मिळण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. पांढरा कांदा उत्पादक सुरेश म्हात्रे यांनी सांगितले की, अलिबाग तालुक्यातील कार्ले परिसरातील पांढऱ्या कांद्याला चव व गुणधर्मांमुळे मोठी मागणी असते. रायगड जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठांसह रत्नागिरी, नवी मुंबई, वाशी, मुंबई आणि पुणे येथून या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. यंदा पांढरा कांदा बाजारात सुमारे १५ दिवस उशिरा दाखल होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.