निवडणुक संपली, कचरा कायम...
esakal January 20, 2026 04:45 AM

निवडणुक संपली, कचरा कायम
आता तरी डोंबिवली विभागीय कार्यालयातील कचरा हटणार का?
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ ः कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीची धामधूम अखेर संपली असून, मतदान व मतमोजणीनंतर शहरातील राजकीय वातावरण शांत झाले आहे. मात्र, निवडणुकीच्या नावाखाली जप्त करण्यात आलेल्या बॅनर्स, होर्डिंग, टाकाऊ साहित्य आणि भंगाराने पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाचा परिसर अजूनही विद्रूप अवस्थेतच आहे. त्यामुळे आता तरी हा कचरा हटवला जाणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरातील बेकायदा जाहिरात साहित्य हटविण्याची जोरदार कारवाई करण्यात आली. मात्र, शहर स्वच्छ करताना हटवलेलेच होर्डिंग आणि बॅनर्स महापालिकेच्या कार्यालयाच्याच आवारात टाकून ठेवण्यात आले. परिणामी, हा परिसर जणू भंगाराच्या गोदामातच रूपांतरित झाला आहे. अनेक दिवसांपासून कचरा पडून असल्याने येथे डास, मच्छर, उंदीर आणि घुशींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
या कार्यालयाच्या शेजारीच महापालिकेची शाळा असून, विद्यार्थ्यांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय जप्त केलेल्या टपऱ्यांचा मुताऱ्यांसारखा वापर होत असल्याने परिसरातील परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नाही.

बेकायदा वाहनतळ म्हणून वापर
एवढेच नव्हे तर डोंबिवली उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात बेकायदाशीरपणे वाहने पार्क करत असल्याने संपूर्ण इमारत आणि आजूबाजूचा भाग अधिकच बकाल झाला आहे. शहरात स्वच्छता, सुशोभीकरण आणि आरोग्याची जबाबदारी असलेल्या घनकचरा विभागाचा हा उरफाटा कारभार नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे.

निवडणूक गेली, आता जबाबदारी कुणाची?
निवडणूक संपल्यानंतर आता तरी महापालिकेने आपल्या कार्यालयाच्या परिसरातील कचरा, भंगार, होर्डिंग आणि बेकायदा वाहनांचा तातडीने निचरा करून परिसर स्वच्छ करावा, अशी ठाम अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. अन्यथा शहर स्वच्छतेच्या मोहिमेचा केवळ दिखाऊपणा उघड होत राहील, अशीही टीका नागरिकांकडून होत आहे. निवडणूक गेली, आता जबाबदारी कुणाची, असा प्रश्न केवळ डोंबिवलीकर विचारत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.