भोर, ता. १८ : येथील भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालयात रविवारी (ता. १८) सकाळी झालेल्या सकाळ चित्रकला स्पर्धेत तालुक्याच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये १४ मूकबधिर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सैराट चित्रपटातील अभिनेता सुरेश विश्वकर्मा यांनी स्पर्धेच्या ठिकाणी हवेली लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रमोद गुजर, मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे, कलाशिक्षक विश्वास निकम, सोमनाथ कुंभार, अजय कोठावळे, दीपक येडवे आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’ आकारामध्ये बसून चित्रे काढली. अभिनेता सुरेश विश्वकर्मा आणि प्रमोद गुजर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून काढणाऱ्या चित्रांबाबत माहिती घेतली. ‘आम्ही आमच्या शालेय जीवनात सकाळच्या चित्रकला स्पर्धेत सहभागी झालो होतो, आणि आता आमच्या मुलांना घेऊन स्पर्धेसाठी आलेलो आहे,’ अशी भावना पालकांनी व्यक्त केली.