swt1840.jpg
18732
सावंतवाडीः ‘डॅझेलिया २०२६’ वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित अच्युत सावंत-भोसले, अस्मिता सावंत-भोसले, संजीव देसाई, रत्नेश सिन्हा व इतर मान्यवर.
स्नेहसंमेलन सांघिक भावनेचे प्रतीक
अच्युत सावंत-भोसलेः भोसले नॉलेज सिटीत ‘डॅझेलिया २०२६’ उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सर्जनशीलता विकसित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भोसले नॉलेज सिटी सदैव कटिबद्ध आहे. सांघिक भावना वाढीस लागावी यासाठी सर्व संस्थांनी मिळून आयोजित केलेल्या हा कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
भोसले नॉलेज सिटीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘डॅझेलिया २०२६’ शनिवारी (ता. १७) उत्साहपूर्ण वातावरणात झाले. संस्थेअंतर्गत कार्यरत सर्व महाविद्यालयांचा एकत्रित सहभाग असलेले हे स्नेहसंमेलन प्रथमच भव्य स्वरुपात आयोजित करण्यात आले. यामध्ये यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी तसेच यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल या संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, अध्यक्षा अस्मिता सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल (निवृत्त) रत्नेश सिन्हा, वायबीआयटी प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, वायबीसीपी प्राचार्य डॉ. विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे व वायबीआयएस मुख्याध्यापिका प्रियंका देसाई उपस्थित होत्या.
गेले पंधरा दिवस संस्थेमध्ये विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांतील अंतिम विजेत्यांना यावेळी पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये बीकेसी स्पोर्ट्स चॅम्पियनशिप यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक विभागाने तर बीकेसी कल्चरल चॅम्पियनशिप फार्मसी कॉलेजने पटकावली. सर्व स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणाऱ्या पहिल्या बीकेसी जनरल चॅम्पियनशिपवर यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकने नाव कोरले. पहिल्यांदाच आयोजित केलेल्या ‘मिस्टर अँड मिस बीकेसी’ स्पर्धेत यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा विद्यार्थी अथर्व काणे ‘मिस्टर बीकेसी’ तर त्याच कॉलेजची सानिया वाईरकर ‘मिस बीकेसी’ किताबाची मानकरी ठरली.
या भव्य सोहळ्यास सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. संपूर्ण कॅम्पसमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आल्यामुळे परिसराला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर प्रभू यांनी केले. त्यांना बोनी शेरॉव्ह यांनी साथ दिली.