- rat१९p५.jpg-
P२६O१८७७९
चिपळूण ः कळकवणे येथील आदिवासी पाड्यावर राजमाता जिजाऊ जंयत्ती साजरी करताना जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी.
----
महिला कार्यकर्त्यांतून राजमाता जिजाऊंच्या विचारांचा प्रचार
जिजाऊ ब्रिगेडचा पुढाकार ; दुर्गम आदिवासी पाड्यात थेट संवाद
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः तालुक्यातील कळकवणे आदिवासी पाडा या दुर्गम आणि उपेक्षित भागात जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. हा केवळ औपचारिक उत्सव साजरा न करता, सामाजिक बांधिलकी जपत या उपेक्षित भागात संस्कारांची शिदोरी पोहोचवण्याचे कार्य जिजाऊ ब्रिगेडने केले आहे.
अनेक मुला-मुलींना राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य काय होते, याची पुरेशी माहिती नाही, अशा दुर्गम भागात हा कार्यक्रम आयोजित केला होता. जिजाऊंच्या जीवनकार्याची, त्यांच्या संस्कारांची आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाची ओळख यावेळी मुलांना करून देण्यात आली. नवीन पिढीच्या मनात इतिहासाविषयी अभिमान आणि स्वाभिमान जागा करणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या जयंतीचे औचित्य साधून जिजाऊ ब्रिगेडने सेवाभावी उपक्रमांवर विशेष भर दिला. याप्रसंगी महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मुलांना खाऊ आणि आवश्यक कपड्यांचे वाटप करून त्यांना मायेचा आधार दिला. राजमाता जिजाऊंच्या मातृत्वाचा वारसा जपत महिला कार्यकर्त्यांनी स्थानिक मुलांशी व महिलांशी थेट संवाद साधला.
जिजाऊ ब्रिगेडचा हा उपक्रम केवळ जयंती साजरी करण्यापुरता मर्यादित न राहता, तो इतिहास, संस्कार आणि सेवाभाव यांचा एक सुंदर संगम ठरला. अशा उपक्रमांतूनच राजमाता जिजाऊंचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील आणि एक सक्षम, स्वाभिमानी पिढी घडेल, असा विश्वास उपस्थितांनी केला. या कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेडच्या मालती पवार, निर्मला जाधव, विना जावकर, अनामिका हरदारे, दीपा हारदारे, मनोरमा पाटील, सुप्रिया कवितके, श्रद्धा कदम, सुवासिनी सावंत यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.