हिर्डोशी, ता. १९ : सायबेज आशा आदर्श गाव योजना, एकात्मिक ग्रामीण जीवनमान विकास कार्यक्रम अंतर्गत आयोजित भात गटशेती स्पर्धेत भोर विभागातून सिद्धिविनायक भात शेती गट चिखलावडे बुद्रुक, तर राजगड विभागातून बळिराजा शेतकरी गट, निधान यांनी प्रथम क्रमांक मिळवत प्रत्येकी ५० हजाराचे रोख बक्षीस व शेतकरी चषकाचे मानकरी ठरले.
भात गटशेती व क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना सायबेज आशा संस्थेचे संस्थापक अरुण नथानी, संचालिका रितू नथानी, अनिष नथानी यांचे हस्ते शनिवारी (ता. १८) करंजे (ता. भोर) येथे बक्षीस वितरण करण्यात आले. करंजे ग्रामस्थांकडून नथानी यांचे रथातून कार्यक्रम स्थळापर्यंत वाजतगाजत स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांकडून नथानी दांपत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी भोर व राजगड तालुक्यातील शेतकरी, सायबेजचे प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
भात गट शेती चषक (पॅडी कप) स्पर्धेत भोर आणि राजगड तालुक्यातील ९६ शेतकरी गटांतून ९६० सदस्यांनी सहभाग घेतला. विजेत्यांना ५० हजार, ३० हजार व २० हजार रुपयांच्या अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकास रोख बक्षीसासह आकर्षक चषक देण्यात आला. ग्रामीण एकता व सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या शेतकरी क्रिकेट स्पर्धेत पुरुष व महिला या दोन्ही प्रकारात ७५ संघांनी सहभाग नोंदवत स्पर्धा यशस्वी पार पाडली. यात महिलांच्या सहभागी ४० संघातून सांगवीच्या पद्मावती महिला संघाने, तर पुरुषांच्या सहभागी ३५ संघातून नाटंबीच्या पद्मावती संघाने प्रथम क्रमांक पटकवला. यात ३३ हजार, २२ हजार आणि ११ हजार अशा रोख बक्षीसासह आकर्षित चषक वितरण करण्यात आले.
भात गट शेती स्पर्धा निकाल
भोर विभाग
प्रथम- श्री सिद्धिविनायक भात शेती गट, चिखलावडे बुद्रुक.
द्वितीय- श्री शिवमुद्रा भात शेती गट, वाठार हिमा.
तृतीय- जय हनुमान भात शेती गट, म्हाळवडी.
राजगड विभाग
प्रथम- बळिराजा शेतकरी गट, निधान.
द्वितीय- पद्मावती शेतकरी गट, सांगवी खुर्द.
तृतीय- सदाभरारी किसान शेतकरी गट, निगडे बुद्रुक.
शेतकरी क्रिकेट स्पर्धा
महिला- प्रथम ः पद्मावती संघ. सांगवी खुर्द.
द्वितीय- गर्जना संघ, शिंद.
तृतीय- जननी कांगुरमल संघ, करंजे.
पुरुष- प्रथम ः पद्मावती संघ, नाटंबी.
द्वितीय- वीर बाजीप्रभू संघ, शिंद.
तृतीय- शेतकरी क्रिकेट संघ, बारे खुर्द.
03002