वाघजाई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ५१ हजारांची देणगी
esakal January 22, 2026 05:45 AM

वाघजाई क्रीडा मंडळाचा सामाजिक ठसा
मंदिर जीर्णोद्धारासाठी ५१ हजार ; कबड्डी स्पर्धेचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २१ ः क्रीडा क्षेत्रासोबतच सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या तेरे (ता. संगमेश्वर) येथील श्री वाघजाई ग्रामदेवता क्रीडा मंडळाने आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत या मंडळाच्यावतीने वाघजाई मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ५१ हजार रुपयांची रोख देणगी सुपूर्द करण्यात आली.
श्री वाघजाई मंदिर येथे १६ जानेवारी रोजी कबड्डी स्पर्धेच्या नियोजनासाठी विशेष बैठक झाली. या बैठकीला ग्रामस्थ आणि देवस्थानचे विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या पाच वर्षांपासून हे मंडळ विविध क्रीडा स्पर्धांसह सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवत आहे. सर्व स्तरातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. देणगीदारांच्या सहकार्यातून क्रीडा मंडळाने मंदिर परिसरात अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात भाविकांसाठी स्वच्छ आणि थंड पाण्याची सोय, मंदिर परिसर प्रकाशमान करण्यासाठी प्रकाशयोजना व आकर्षक दीपस्तंभ, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ५१ हजार रुपयांचा निधी मंडळाने विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. १९ जानेवारी रोजी झालेल्या श्री वाघजाई ग्रामदेवता मंदिर विश्वस्त मंडळाच्या सभेत क्रीडा मंडळाच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली. मंडळाच्या सामाजिक, धार्मिक आणि विकासात्मक कार्याचे कौतुक करणारा औपचारिक ठराव या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. भविष्यातही भाविकांसाठी अशाच उपयुक्त सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प क्रीडा मंडळाने या वेळी व्यक्त केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.