IND vs NZ : टीम इंडियाला फुकटात मिळाल्या 12 धावा, न्यूझीलंडने 6 चेंडूत केल्या तीन चुका
Tv9 Marathi January 22, 2026 05:45 AM

न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका ही टी20 वर्ल्डकप स्पर्धेपू्र्वीची चाचणी परीक्षा आहे. या चाचणी परीक्षेत अभिषेक शर्मा पास झाल्याचं पाहायला मिळालं. त्याने आक्रमक खेळी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने 35 चेंडूत 84 धावांची खेळी केली. त्याचं शतक फक्त 16 धावांनी हुकलं. त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाला 200 पार धावा करता आल्या. भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 238 धावा केल्या. यात फुकटच्या 12 धावांचा समावेश आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकाने एकाच षटकात तीन चुका केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 12 धावांचा फटका बसला. न्यूझीलंडचा संघ क्षेत्ररक्षणात चांगला आहे. पण या सामन्यात काही वेगळंच चित्र पाहायला मिळालं.

न्यूझीलंडने आठव्या षटकात गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडवलं. अभिषेक शर्मा वेगाने धावा काढत होता. असं असताना ग्लेन फिलिप्सने गोलंदाजीची कमान सांभाळली. पहिलाच चेंडू ऑफ स्टंपच्या जवळ टाकला. पण अभिषेकने आक्रमक पण बॅकफूटवरून लाँग ऑफच्या दिशेने शॉट मारला. क्षेत्ररक्षक ख्रिस्टियन क्लार्कने अडवण्याचा प्रयत्न केला पण काही अडवला नाही. त्यात चार धावा आल्या. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा ख्रिस्टियन क्लार्ककडे चेंडू मारला. पुन्हा गचाळ क्षेत्ररक्षण केलं. यात चार धावा आल्या. ख्रिस्टियन क्लार्क चेंडू चाचपडत राहिला. त्यानंतर या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तसंच घडलं. विकेटकीपर चेंडू पकडण्यात अपयशी ठरला. वाइड चेंडूवर चार धावा आल्या.

न्यूझीलंडला या षटकात झालेल्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. या षटकात एकूण 20 धावा आल्या. पहिल्या तीन चेंडूवर चौकार आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर 1 धाव घेत अभिषेक शर्माने अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पाचव्या चेंडूवर सूर्यकुमारने एक धाव घेत अभिषेकला स्ट्राईक दिली. शेवटचा चेंडू टाकताना वाइडवर चौकार आला. म्हणून या चेंडूवर 5 धावा आल्या. तर शेवटच्या चेंडूवर अभिषेक शर्माने 1 धाव काढली.

भारताने न्यूझीलंडविरूद्ध 200 पार धावा केल्या आहे. न्यूझीलंडने एकदाच इतकी मोठी धावसंख्या भारताविरुद्ध गाठली आहे. 10 वर्षांपूर्वी अशी कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर असं कधी घडलं नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.