देव शिक्षा देतो हे श्रीच्या मनावर ठसले
esakal January 22, 2026 09:45 AM

परिवर्तन---------लोगो
(१५ जानेवारी पान ६)

देव शिक्षा देतो हे
श्रीच्या मनावर ठसले

होळीला गाऱ्हाणे घालण्याचा मान खोताचा! इतर कोणीही गाऱ्हाणे घातले तर ते देवापर्यंत पोचत नाही तसेच असे गाऱ्हाणे इतर कोणी घातलेले देवालाही आवडत नाही, असा समज पूर्वीच्या अनुभवावरून गावकऱ्यांनी करून घेतला होता. बाबांनाही तसेच वाटत होते. पूर्वी एक वर्षी भरपूर गाऱ्हाणी घालून बाबांचा घसा बसला. त्यामुळे त्यांनी एका वाडकऱ्याला गाऱ्हाणे घालायला सांगितले. त्याने पुढची गाऱ्हाणी घालण्यास सुरुवात केली. एक गाऱ्हाणे पुरे झाले. तो दुसरे सुरू करणार तोच होळीजवळ साप बाहेर आला. वाडकरी घाबरले आणि त्यांनी त्याला थांबवले. बाबांनाही हा देवाने चुकीच्या वागणुकीबाबत दिलेला इशाराच आहे, असे वाटले. थोडावेळ आराम करून त्यांनीच उरलेली गाऱ्हाणी पूर्ण केली. या सर्व गोष्टींचा श्री नेमस्त प्रेक्षक होता. या प्रसंगामुळे त्याच्या मनात ही देवाप्रति श्रद्धा अधिक दृढ झाली.

- rat२१p२.jpg-
26O19176
- डॉ. शरद प्रभूदेसाई, रत्नागिरी
-------
सर्व सणामध्ये श्रीचा खारीचा वाटा असे. होळीला होळीपूजन आणि गुढीपाडव्याला गुढीपूजन यथासांग पार पडे. या सर्व सणात केली जाणारी देवपूजा आणि देवासाठी करण्यात येणारा नैवेद्यं यामुळे श्रीचे मन अधिकाधिक भाविक आणि श्रद्धाळू होऊ लागले. देवाची आराधना मनापासून केली पाहिजे, असे त्याला वाटू लागले. देव सर्व काही करतो. त्यामुळे त्याची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवणे महत्त्वाचे असते, हे त्याच्या बालमनावर पक्के कोरले गेले. आईने नवीन काही पदार्थ बनवल्यास तो वाटीतून देवाजवळ ठेवण्याचे काम श्रीकडे असे. हे काम श्री आनंदाने करत असे. त्याला हे काम दोन कारणासाठी आवडे. एक म्हणजे देवाला नैवेद्य दाखवल्यामुळे देव प्रसन्न होणार आणि तो देवासमोर ठेवलेला प्रसाद श्रीला खायला मिळणार. दुसरे असा नैवेद्य दिल्यास देव आपल्यावर प्रसन्न होतो, आपले तो भले करतो, असे त्याच्या आईने त्याला सांगितले होते. त्या वयात देव प्रसन्न होतो म्हणजे काय, भले करतो म्हणजे काय आणि चांगली बुद्धी देतो म्हणजे काय, हे श्रीला कळत होते. काय हा प्रश्नच होता; पण मोठ्यांच्या विचाराप्रमाणे वागणे योग्य असते, असे त्याला वाटत असे. असे वागले नाही तर देव शिक्षा देतो, हे त्याच्या मनावर ठसले होते. अर्थात, शिक्षा म्हणजे काय याचीही त्याला कल्पना नव्हती; पण शिक्षा म्हणजे काहीतरी वाईट होणे आणि ते टाळण्यासाठी तो या सर्व गोष्टी करत होता. या सर्व गोष्टी म्हणजे पूजाअर्चा, सोवळ्याचे नियम पाळणे तसेच शिवाशीव पाळणे इत्यादी बाबींचा अंतर्भाव होता.
श्रीचे घराणे खोताचे. त्यामुळे गावदेवळात त्याच्या बाबांना भलताच भाव होता. बाबांच्या हुकुमाशिवाय गावदेवळातील एकही गोष्ट चालू होत नसे. बाबांचेही प्रत्येक बाबतीत आपला हुकूम घेतला जातो की, नाही यावर जातीने लक्ष असे. गावदेवळातील होळीचा सण सर्वात महत्वाचा! या सणाआधी देवाचे चांदीचे मुखवटे साफ करून पालखीत ठेवतात. काही सणांना पालखी नसते मग हे मुखवटे देवळात लावत. पेटीतून काढून ते पालखीत किंवा देवळात लावून त्यांची पूजा करणे याला रूपे लावणे असे म्हणतात. हा रूपे लावण्याचा समारंभ वर्षातून चार-पाच सणाना करत. या रूपे लावण्याआधी बाबांची परवानगी घेणे क्रमप्राप्त होते. वाडीतील एक वाडकरी परवानगी मागायला बाबांकडे येई. वाडीतील माणसाकडून देवाचेबाबत काही गुन्हा झाला असेल तर त्याचे निरसन या वेळी होत असे. रूपे लावण्याआधी खोताची परवानगी (हुकूम) घेतली नाही तर वाडीवर काही अरिष्ट्य येईल, अशी वाडकऱ्यांची खात्री होती, असे अरिष्ट्य ओढवून घेण्यात कोणालाच स्वारस्य नव्हते.
होळीचा सण सर्व सणात महत्वाचा. या सणात आधी खोताची परवानगी घेऊन रूपे लावतात. त्यानंतर होळी तोडण्याचा हुकूम खोतांकडून घेतात. होळी तोडल्यानंतर ती शास्त्रानुसार उभी राहते की, नाही याबाबत बाबा आणि वाडकरी काटेकोर असत. काही शंका असल्यास ग्रामोपाध्याचा सल्ला घ्यायला वाडकऱ्याना बाबा सांगत. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सर्व काही केले जाई. होळी कुठची आणायची याची माहिती बाबांना दिली जाई. बाबांना त्यांच्या शिस्तीबाहेर काहीही केलेले चालत नसे. तसा बेशिस्तपणा कोणी केल्यास त्याची बाबा स्पष्टपणे कानउघडणी करत. याबाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत.
होळी उभी करणे म्हणजे आंबा, पोफण, सुरमाड किंवा अन्य झाड देवळाच्या आवारात खड्ड्यात पुरून उभे करणे. श्रीच्या गावी उत्तम शेंडा असलेले सरळ आंब्याचे झाड तोडून आणून ते उभे करत. देवळाजवळ दरवर्षी ठरलेल्या ठिकाणी पालखी नाचवीत. या जागेवर होळीसाठी तोडलेले झाड आणून ठेवत. होळी तोडण्याचा कार्यक्रम शक्यतो पहाटे चार वाजता होत असे. पालखी नाचवण्याच्या जागेवर होळी आणून ठेवली की, वाडकरी मानकऱ्यांना हाकारे घालीत. सर्व मानकरी पालखी नाचावयास हजर असणे गरजेचे असे. मानकरी जमल्यावर खोताना आणि उपाध्यांना आमंत्रण दिले जाई. श्रीच्या घरची म्हणजे खोतकडची माणसे पालखीचा नाच पाहायला जातीने हजर असत. झोपेतून उठून जायला लागले तरी याबाबत श्री उत्साही होता. तो सर्वांच्या पुढे असे. पालखीचा नाच पाहायला त्याला आवडेच; पण पालखी नाचवायलाही त्याला आवडे. कधी कधी गावकऱ्यांच्या मदतीने हा पालखी नाचवण्याचा प्रयत्न करी. एकटा माणूस डोक्यावर पालखी घेऊन नाचे त्याचे त्याला विशेष कौतुक वाटे.

(लेखक बालरोगतज्ज्ञ आणि चिंतनशील अभ्यासक आहेत.)
----------

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.