swt211.jpg
19223
कट्टा ः वराडकर प्रशालेतर्फे आयोजित स्नेहमेळाव्यास उपस्थित माजी विद्यार्थी व मान्यवर.
‘वराडकर’ च्या ‘चिमण्यांची’ शाळेकडे धाव
दोन लाखांचा कृतज्ञता निधी; माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ ः शतक महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टाच्या १९८१- ८२ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘या चिमण्यांनो परत फिरा शाळेकडे आपुल्या’ या आवाहनास प्रतिसाद दिला. तब्बल ४३ वर्षांनी प्रथमच एकत्रित आलेल्या या विद्यार्थ्यांनी २ लाख २ हजार २६ रुपये एवढा कृतज्ञता निधी शाळेला दिला.
प्रशालेच्या सिद्धिविनायक सभागृहात स्नेहमेळावा उत्साहात झाला. यावेळी माजी विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना पंचारतीने ओवाळून औक्षण केले. ढोल-ताशा, लेझीम आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी परेड, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी (कै.) डॉ. काकासाहेब वराडकर यांच्या पुतळ्यास माजी विद्यार्थिनी लिला वाईरकर आणि विजया शहाणे यांनी पुष्पहार अर्पण केला. उदय वांगणकर यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केली.
या मेळाव्यास देशविदेशातून, उच्च पदस्थ अधिकारी व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार, यशस्वी आधुनिक शेतकरी, तंत्रज्ञ वर्गातून माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. मेळाव्याचे उद्घाटन प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा वासंती किणीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक बी. एस. आकेरकर, एस. व्ही. तांबीटकर, बी. एस. काळे, बी. टी. माने, एस. डी. गावडे, जे. बी. सामंत, महादेव वाईरकर, तुकाराम जांभवडेकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, स्कूल कमिटी चेअरमन सुधीर वराडकर, मुख्याध्यापिका देवयानी गावडे उपस्थित होते. प्रास्ताविक लीला वाईरकर यांनी केले. संतोष चव्हाण यांनी शाळेच्या आठवणी जागृत केल्या. अध्यक्ष वराडकर यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.
‘ये दोस्ती कभी नही टुटेगी’ या गाण्याने माजी विद्यार्थ्यांनी धरलेला ठेका लक्षवेधी ठरला. सूत्रसंचालन विद्या नाचवणेकर, मंगल कदम यांनी केले.
चौकट
इच्छापत्राप्रमाणे ५२ लाख जमा
संस्थेचे सचिव सुनील नाईक यांनी, शतक महोत्सवी निमित्ताने शाळेच्या विस्तारीकरणाचे काम संस्थेने हाती घेतलेले आहे. यासाठी माजी विद्यार्थी चित्तरंजन व चित्रा जठार या उभयतांनी आपल्या मुंबईतील एका फ्लॅटची ७५ टक्के रक्कम शाळेला देण्यात यावी, असे इच्छापत्रात लिहून ठेवले होते. त्याप्रमाणे ५१ लाख ९० हजार रुपये संस्थेकडे जमा होत आहेत, असे सांगितले.