रत्नागिरी- विद्यार्थ्यांनी शुद्ध विज्ञानाचा मार्गही निवडावा
esakal January 24, 2026 06:45 AM

rat23p2.jpg-
19565
रत्नागिरी : रा. गो. जागुष्टे हायस्कूलमध्ये रासायनिक अभियंता गौरी सुर्वे हिचा सत्कार करताना दाक्षायणी बोपर्डीकर. डावीकडून रवींद्र इनामदार, शेखर शेट्ये, राजीव गोगटे, भास्कर झोरे आदी. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
-------

विद्यार्थ्यांनी शुद्ध विज्ञानाचा मार्गही निवडावा
दाक्षायणी बोपर्डीकर; गौरी सुर्वेचा जागुष्टे हायस्कूलमध्ये सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचे यश आपल्यासमोर येते तेव्हा त्याला यशासाठी कोणते प्रयत्न करावे लागले, याची माहिती उलगडत जाते. रा. गो. जागुष्टे हायस्कूलची माजी विद्यार्थिनी गौरी सुर्वे हिने आयआयटी कानपूर येथून रासायनिक अभियंता पदवी मिळवली. मराठी माध्यमातून शिकता असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना तिने यश मिळवत चोख उत्तर दिले आहे. आयटीच्या युगात शुद्ध विज्ञानाचा मार्ग तिने निवडला. याकडेही आताच्या विद्यार्थ्यांना जाता येईल, असे प्रतिपादन दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा दाक्षायणी बोपर्डीकर यांनी केले.
रासायनिक अभियंता पदवी प्राप्त केल्याबद्दल गौरीचा संस्था व शाळेच्यावतीने गौरव करण्यात आला. त्या प्रसंगी बोपर्डीकर बोलत होत्या. सत्कार समारंभात गौरीचा सत्कार केला. या वेळी गौरीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ती म्हणाली, जागुष्टे हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेतून मी ९२ टक्क्यांसह दहावी झाले. बारावीत ९१ टक्के मिळवले. मला इंग्रजीची भीती वाटली नाही, मातृभाषेवर वर्चस्व असेल तर आपण कोणतीही भाषा शिकू शकतो, हे मला शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे मला शाळेचा अभिमान वाटतो. जेई ॲडव्हान्समध्ये निवड झाल्यावर भारतात ७५००वी रॅंक मिळून आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला. तिथे नुकतेच शिक्षण पूर्ण केले. आता मला एमएस करायचे आहे. सत्काराबद्दल शाळा व संस्थेची मी ऋणी आहे.
कार्यक्रमाला संस्था सचिव राजीव गोगटे, उपकार्याध्यक्ष शेखर शेट्ये, मुख्याध्यापक भास्कर झोरे, फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक राजन कीर, माजी मुख्याध्यापक श्रीकृष्ण जोशी व माजी उपमुख्याध्यापक आनंद पाटणकर, गौरीचे आई-वडील उपस्थित होते. मुख्याध्यापक झोरे यांनी गौरीचे विशेष कौतुक करून शाळेला अशा माजी विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो, असे सांगितले. रेखा पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. सुनील जाधव यांनी गौरीचा परिचय करून दिला. चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.