कलेढोण - थायलंड येथे झालेल्या मिशन ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेत मायणी (ता. खटाव) येथील सतरा वर्षीय पैलवान चैतन्य मच्छिंद्र साळुंखे याने ७९ किलो वजनगटात देशाचे प्रतिनिधित्व करून आंतरराष्ट्रीय फ्री स्टाइल चॅम्पियन कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. दरम्यान, मच्छीमाराचा मुलगा ऑलिंपिकवीर झाल्याने परिसरातून कौतुक होत आहे.
चैतन्यने वयाच्या १५ व्या वर्षापासून कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यास प्रारंभ केला. त्याने यापूर्वी तालुका व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक, तर राज्यपातळीवरील कुस्ती स्पर्धेत रजतपदक प्राप्त केले आहे. देशांतर्गत बेळगाव येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत ७९ किलो वजनगटात सुवर्ण व २०२४ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ६५ किलो वजनगटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
थायलंड येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत त्याने कजाकिस्तान व उजबेकिस्तान या देशातील पैलवानांचा पराभव करून अखेरच्या कुस्तीत मलेशियाच्या पैलवानास चारीमुंड्या चीत करून सुवर्णपदक खेचून आणले.
चैतन्यचे शिक्षण मायणी येथील प्राथमिक शाळा व भारतमाता विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे झाले असून, तो सध्या इयत्ता बारावीमध्ये कला शाखेत शिक्षण घेत आहे. वडील मच्छिंद्र साळुंखे हे मच्छीमारीचा व्यवसाय करून प्रपंच चालवितात.
अत्यंत आर्थिक अडचणीची परिस्थिती असतानाही त्यांनी त्यावर मात करून आपल्या मुलाला पैलवान बनवण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या यशाबद्दल मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे, संचालक, ग्रामपंचायत व ग्रामस्थ, शिक्षकांनी अभिनंदन केले.
सरकारकडून मदतीची अपेक्षा
राज्य सरकारने चैतन्यच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करून त्याचा सत्कार करावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्याच्या पुढील शिक्षणाची व कुस्ती कारकिर्दीची जबाबदारी उचलून त्याच्या कुस्तीच्या खेळास चालना व प्रेरणा द्यावी, अशा भावना नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.