पिंपरी, ता. २३ : रस्त्याच्या दुतर्फा दुपारी एकपासून लहानथोरांची गर्दी, सायकलस्वारांना पाहण्याची उत्सुकता, हातात तिरंगा ध्वज घेऊन हजर झालेले ज्येष्ठ नागरिक आणि सायकलस्वार आल्यावर टाळ्या-शिट्यांसह झालेला जल्लोष असे वातावरण निगडी-प्राधिकरण येथील रस्त्यांवर शुक्रवारी (ता.२३) पाहायला मिळाले. तर, ‘‘आपल्या शहरात इतकी मोठी सायकल स्पर्धा पार पडली याचा आनंद आणि अभिमान आहे,’’ असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
बालेवाडी येथून स्पर्धेला सुरुवात झाल्याचे अपडेट्स ऑनलाइन मिळाल्यानंतर गर्दी वाढली. सायकलस्वार कुठे आले याचे अपडेट क्षणाक्षणाला घेतले जात होते. सायकलस्वारांच्या पुढे असलेल्या ताफ्यांमधील वाहनचालकांनाचेही टाळ्या वाजवून स्वागत केले जात होते. दोनच्या सुमारास सायकलस्वार स्वामी विवेकानंद चौकात दाखल झाले. कॅमेरा सुरू करून आधीच सज्ज असलेल्या तरुणांनी व्हिडिओ आणि फोटो घेतले. लहान मुलांसह नागरिकांनी एकच जल्लोष करत टाळ्यांचा कडकडाट केला. संत ज्ञानेश्वर महाराज चौकातही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सायकलस्वार क्षणार्धात संत ज्ञानेश्वर महाराज चौकाकडून भक्ती शक्तीकडे मार्गस्थ झाले आणि एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून आला. स्पर्धेनिमित्त शाळांना सुटी असल्याने शाळकरी विद्यार्थीही उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने यात सहभागी होते. सायकलस्वारांनंतर पिंपरी चिंचवड पोलिस, वाहतूक पोलिस आणि वैद्यकीय टीमची वाहने या मार्गावरून पुढे गेली. नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत पोलिस कर्मचारी व वैद्यकीय टीमचेही अभिनंदन केले.