
मुंबई : नुकताच प्रदर्शित झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट 'धुरंधर'मध्ये दिसलेला अभिनेता नदीम खान आता गंभीर संकटात सापडला आहे. त्याच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेने त्याच्यावर बलात्कार आणि दीर्घकाळ लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली आहे. हे प्रकरण मुंबईच्या वर्सोवा भागाशी संबंधित असून त्याची बरीच चर्चा आहे.
४१ वर्षीय महिलेने केला आरोप
नदीम खान लग्नाचे खोटे आश्वासन देऊन गेल्या 10 वर्षांपासून आपली फसवणूक करत असल्याचा आरोप एका 41 वर्षीय महिलेने केला आहे. या भरवशावर त्याने महिलेशी अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. महिलेचे म्हणणे आहे की, जेव्हा तिने लग्नाबद्दल बोलले तेव्हा नदीमने नकार दिला. यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवणी येथील महिलेच्या घरी ही घटना घडली.
पोलिसांनी 22 जानेवारीला अभिनेत्याला अटक केली होती. प्रथम वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र ही घटना मालवणी परिसरात घडल्याने तो 'झिरो एफआयआर' अंतर्गत मालवणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सध्या नदीम खान पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे.
नात्याची सुरुवात कशी झाली?
तक्रारीनुसार, ही महिला वेगवेगळ्या कलाकारांच्या घरी काम करायची. अनेक वर्षांपूर्वी ती नदीम खानच्या संपर्कात आली. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढत गेली.
नदीमने लग्नाचे आमिष दाखवून महिलेचा विश्वास जिंकला आणि त्यानंतर तिच्या घरी आणि वर्सोवा येथील घरी तिचे अनेकवेळा शोषण केले. जेव्हा महिलेने लग्नाची मागणी केली तेव्हा अभिनेत्याने नकार दिला, त्यानंतर महिलेने कायदेशीर कारवाई केली.
नदीम खान कोण आहे?
नदीम खानला नुकत्याच आलेल्या 'धुरंधर' या चित्रपटातून बरीच ओळख मिळाली. या चित्रपटात त्याने अक्षय खन्नाच्या रेहमान डाकू या पात्राचा स्वयंपाकी अखलाकची भूमिका साकारली होती. त्याची भूमिका छोटी असली तरी चित्रपटाच्या यशामुळे लोक त्याला ओळखू लागले. याशिवाय त्याने 'वध' या क्राइम थ्रिलर चित्रपटातही काम केले असून इतर अनेक प्रोजेक्ट्समध्ये साईड रोल्स केले आहेत.