गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल करा, माधवी यांना प्रकाश आंबेडकरांचा फोन, समर्थनार्थ घोषणाबाजी
Marathi January 27, 2026 06:25 AM

नाशिक: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणावर वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी आक्षेप घेतला होता. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव भाषणाच्या दरम्यान का घेतलं नाही, असे म्हणत या महिला कर्मचाऱ्यांनी तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केला. त्यामध्ये, माधवी जाधव यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video viral) झाला. मी मातीकाम करेन, मला सस्पेंड करा पण बाबासाहेबांचं नाव संपवण्याचं काम मी होऊ देणार नाही, अशा शब्दात त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही माधवी जाधव (नाशिक) यांना फोन करुन संवाद साधला. आता, माधवी जाधव यांनी गिरीश महाजन यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे.

वन विभागातील या दोन महिला कर्मचाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच कार्यक्रमाच्या वेळी गोंधळ घातला. त्यामुळे, पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेऊन सरकार वाडा पोलीस ठाण्यात आणले. या घटनेनंतर माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींच्या समर्थनार्थ पोलीस स्टेशनच्या बाहेर नागरिकांनी, बाबासाहेबांच्या अनुयायांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर, माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली असून नाशिक पोलीस यासंदर्भात कारवाई करत आहे. ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वनरक्षक कर्मचारी महिलांनी केली आहे. तर, प्रकाश आंबेडकर यांनीही माधवी जाधव यांच्याशी फोनवरुन संवाद साधल माहिती जाणून घेतली. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.

प्रकाश आंबेडकरांचा माधवी जाधव यांना फोन

नाशिकमध्ये आज भाजप मंत्री गिरीश महाजनच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव (वनरक्षक) महिलेसोबत फोनवर बोललो. यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला. मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य अट्रोसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. तसेच, आरएसएस-भाजपाकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजप आणि गिरीश महाजनच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनीही भूमिका मांडली.

गिरीश महाजनांकडून दिलगिरी

दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात अनावधानाने बाबासाहेबाचे नाव राहिले, माझा तसा कुठलाही हेतू नव्हता असे म्हणत घडल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

हेही वाचा

शरद पवार राष्ट्रदोही, संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; आक्षेपार्ह शब्द वापरल्याने राष्ट्रवादीच्या समर्थकांचा संताप

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.