धुरंधर अभिनेता नदीम खानला अटक : ‘धुरंधर’ चित्रपटात झळकलेला अभिनेता नदीम खान याला घरकाम करणाऱ्या महिलेसोबत तब्बल दहा वर्षे लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर नदीम खान नेमका कोण आहे, त्याचं काम काय आहे, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याच्याबद्दलची माहिती.
धुरंधर चित्रपटातील अभिनेता नदीम खान यास घरकाम करणाऱ्या महिलेशी जवळपास 10 वर्षे बलात्कार व लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तक्रारदार महिला अभिनेता नदीम खानच्या घरी घरकाम करत होती, नदीम खानने तिला लग्नाचे खोटे आश्वासन देत अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवले. सन 2015 पासून आरोपी नदीम खान याने महिलेचा विश्वास संपादन करुन वारंवार तिच्यावर अत्याचार आणि बलात्कार केला. सुरुवातीला याप्रकरणी तक्रार करण्यास महिलेला भीती वाटत होती. मात्र, आरोपीने लग्नास स्पष्ट नकार दिल्यानंतर आणि मानसिक छळ वाढवल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली.
दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी अभिनेता नदीम खान विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. या अभिनेत्याने मुंबई शहरात आणखी किती महिलांसोबत अशा पद्धतीने विश्वासघात केला आहे, किंवा इतर काही महिलांच्या तक्रारी आहेत का, या अनुषंगाने मालवणी पोलीस अधिक तपास करत आहे.
नदीम खानच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलकडे पाहिल्यास तो गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत सक्रिय असल्याचं दिसून येतं. त्याने चित्रपट, टेलिव्हिजन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध भूमिका साकारल्या असून बहुतांश वेळा तो सहाय्यक भूमिकांमध्ये दिसला आहे.
चित्रपटसृष्टीबरोबरच नदीम थिएटरमध्येही सक्रिय होता. त्याने अनेक नाट्यप्रयोगांमध्ये काम केलं आहे. तो मूळचा कुठला आहे याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही, मात्र सोशल मीडियावरून तो बराच काळ मुंबईत वास्तव्यास असल्याचं दिसून येतं.
अनेकांना माहिती नसेल, पण नदीम खानने अमिताभ बच्चन, असरानी, आदिल हुसेन आणि संजय मिश्रा यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही काम केलं आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या कलाकारांसोबतचे अनेक जुने फोटो पाहायला मिळतात. नदीम खानने ‘मिमी’, ‘वध’, ‘मुखबीर: द स्टोरी ऑफ अ स्पाय’, ‘मिसेस सिरियल किलर’ आणि ‘धडक’ अशा चित्रपट व वेबसीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटात नदीम खानने रेहमान डाकैतचा स्वयंपाकी अहलक ही भूमिका साकारली होती. कथानकात अहलक हा रेहमान बलोचचा विश्वासघात करणारा माहितीदार असल्याचं उघड होतं. तो एसपी चौधरी (संजय दत्त) यांना गुपचूप मदत करत असतो. एका भीषण प्रसंगात रणवीर सिंगच्या हमझा मझहरी या पात्राकडून सत्य बाहेर काढण्यासाठी अहलकची बोटं छाटल्याचं दाखवलं जातं. अखेरीस माहितीदार असल्याचं उघड झाल्यानंतर अहलकचा मृत्यू होतो. दरम्यान, नदीम खानवरील आरोपांप्रकरणी पुढील तपास सुरू असून या प्रकरणाकडे संपूर्ण मनोरंजनविश्वाचं लक्ष लागलं आहे.
आणखी वाचा