Ajit Pawar Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा आज (28 जानेवारी ) सकाळी बारामती विमानतळावर येत असताना भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते प्रचारासाठी बारामतीला जात होते. धावपट्टीकडे जाताना रनवेच्या बाजूला विमान क्रॅश झालं. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झालाय. यात त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, एक अटेंडंट तसेच दोन पायलट्स यांचा समावेश आहे. अजित पवारांचे पार्थिव बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, रुग्णालयाच्या बाहेर प्रचंड मोठी गर्दी झाली आहे.अजित दादांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते, नागरिक जमा होताना दिसतायत . गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही प्रत्यक्षदर्शीही या गर्दीत उपस्थित आहेत. विमान हवेत असताना विमानानं अचानक घिरट्या घेतल्या. अवघ्या काही सेकंदात स्फोट झाला. अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं?
हॉस्पिटलबाहेर जमलेल्या गर्दीत काही प्रत्यक्षदर्शींनी अपघाताचा थरार सांगितला. ते म्हणाले' अगोदरच गावामध्ये जाताना विमान थोड डगमगत होतं .दोन गावांच्यामधून जाताना विमान बरंच खालून जात होतं .साधारण 30- 40 फुटाच्या अंतरावर विमान हलू लागलं होतं .तिसऱ्या राऊंडला धावपट्टीवर लँडिंग करताना जागेवरच विमानाचा स्फोट झाला. '
अपघात होताच दादा आम्हाला ओळखू आले .लक्षात येताच दादांची बॉडी आम्ही ॲम्बुलन्समध्ये टाकली. दुसरे त्यांचे पीए होते. त्यांचाही मृतदेह गाडीत ठेवला . अपघाताची माहिती कळताच अग्निशमन दलही लगेच पोहोचले होते. आम्ही मृतदेह उचलायला आणि अग्निशमन दल यायला एकच वेळ झाली . असं प्रत्यक्षदर्शी प्रमोद मदुरीकर यांनी सांगितलं.
1. अजित पवार
2. विदीप जाधव
3. पिंकी माळी
4. कॅप्टन सुमित कपूर
5. कॅप्टन शांभवी पाठक
अजितदादांचे निधन हे माझ्याकरिता वैयक्तिक नुकसान आहे. एकदम गार आणि दिलदार असा मित्र मला आज सोडून गेला. महाराष्ट्रकरिता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यावर जी पोकळी निर्माण होते, ती भरून काढणं अतिशय कठीण आहे. निश्चितच इतक्या जवळून आणि इतक्या संघर्षाच्या काळात एकत्र काम केलेलं असताना अशा गोष्टीवर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले .