सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटातील बरेच सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रपटातून प्रेक्षकांना एक सरप्राइजसुद्धा मिळाला आहे. ‘बॉर्डर 2’च्या शेवटच्या श्रेयनामावलीत ‘धुरंधर’ फेम अक्षय खन्नाला पाहिलं गेलं. अक्षयच्या या कॅमिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. इतकंच नव्हे तर ‘धुरंधर’च्या यशाचा फायदा घेण्यासाठी ‘बॉर्डर 2’मध्ये अक्षयचा सीन दाखवण्यात आल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला. त्यावर आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट 23 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय.
‘बॉर्डर 2’च्या एंड-क्रेडिट्समध्ये एक छोटासा सीक्वेन्स दाखवण्यात आला आहे. यामध्ये 1997 च्या ‘बॉर्डर’मधील अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, पुनीत इस्सार आणि सुदेश बेरी प्रेक्षकांसमोर येतात. या सर्व कलाकारांच्या भूमिका ‘बॉर्डर’च्या पहिल्या भागात शहीद झाल्याचं दाखवलं होतं. प्रेक्षकांनी या सीनचे क्लिप्स ऑनलाइन शेअर केले आहेत. ‘धुरंधर’च्या अभूतपूर्व यशानंतर प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी अक्षयचा कॅमिओ अशा पद्धतीने दाखवल्याची चर्चा त्यावरून होत आहे. यावर निर्माते भूषण कुमार यांनी आपली बाजू मांडली आहे.
OMG #AkshayeKhanna and #SunielShetty in #Border2 🤯💥#SunnyDeol pic.twitter.com/mJjOzo7PB8
— Saurabh Singh (@Mt_Saurabh)
‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत भूषण कुमार म्हणाले, “तुम्ही असा चित्रपट अशा पद्धतीने बनवू शकत नाही. हे आधीपासूनच स्क्रिप्टेड होतं. किंबहुना आम्ही त्याचा (अक्षय खन्ना) भाग ‘धुरंधर’च्या प्रदर्शनानंतर शूट केला होता. चित्रपट आणि अक्षयबद्दलचा उत्साह पहिल्यापासूनच होता, परंतु आम्ही कधी त्याचा फायदा उचलण्याचा विचार केला नाही. स्क्रिप्टमध्ये त्याची गरज नव्हती. पण ‘धुरंधर’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा भाग जोडला, असं नाही.”
‘बॉर्डर 2’चे दिग्दर्शक अनुराग सिंह यांनीसुद्धा यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आम्ही त्याचा भाग 10-11 डिसेंबर रोजी शूट केला होता. ‘बॉर्डर 2’मध्ये अक्षय खन्ना हा मूळ बॉर्डरला ट्रिब्युट देण्याच्या हिशोबाने आहे. तो या कथेचा भाग सुरुवातीपासूनच होता आणि चित्रपट संपल्यानंतर जे प्रेक्षक थिएटरमध्ये थांबतात, त्यांच्यासाठी हा सुवर्णक्षण असेल.” या सीक्वेलमध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.