Lifestyle Diseases : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतोय लठ्ठपणाचा धोका; 'ही' आहेत लठ्ठपणाची कारणे
esakal January 29, 2026 06:45 PM

Causes of Obesity in Modern Lifestyle : आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगात मानवी जीवनशैलीत मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. तंत्रज्ञानाच्या सोयींमुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या असून, त्याचा थेट परिणाम आरोग्यावर जाणवत आहे.

बदलती जीवनशैली, बैठे काम, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, मानसिक ताणतणाव आणि असंतुलित आहार यामुळे लठ्ठपणाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लठ्ठपणा हा केवळ शरीराच्या वजनापुरता मर्यादित नसून, तो अनेक गंभीर आजारांचे कारण ठरू शकतो. याबाबत समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे.

लठ्ठपणाची ही आहेत कारणे

आज बहुतांश लोक तासन्तास संगणकासमोर बसून काम करतात. चालणे, धावणे किंवा व्यायाम करण्यासाठी वेळच काढला जात नाही. यासोबतच फास्ट फूड, पॅकेज्ड अन्न, साखरयुक्त पेये, तळलेले पदार्थ यांचे अतिसेवन वाढले आहे. हे अन्नपदार्थ चवीला आकर्षक असले, तरी आरोग्यास हानिकारक आहेत. त्यामध्ये असलेले सॅच्युरेटेड फॅट्स आणि साखर शरीरात चरबी साठवण्याचे काम करतात. तसेच रात्री उशिरापर्यंत जागरण, अपुरी झोप आणि सततचा मानसिक ताण यामुळे हार्मोनल असंतुलन होऊन वजन वाढते.

Organ Donation Facts : तुम्हाला माहीत आहे का? मानवी शरीरातील 'हा' अवयव दान करणे पूर्णपणे अशक्य! पोषक आणि संतुलित आहाराचे महत्त्व

निरोगी शरीरासाठी पोषक आहाराचा अवलंब करणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, दूध व दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश असावा. पुरेसे पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बाजारात सहज उपलब्ध असलेले चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, बिस्किटे, बर्गर यांसारख्या पदार्थांपासून शक्यतो दूर राहणे गरजेचे आहे. वजन वाढल्यास शरीरात आळशीपणा येतो. काम करण्याची क्षमता कमी होते आणि अनेक शारीरिक तक्रारी निर्माण होतात.

लठ्ठपणाची लक्षणे आणि परिणाम

लठ्ठपणाची लक्षणे व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकतात. शरीरावर अतिरिक्त चरबी साठणे, सतत थकवा जाणवणे, चालताना किंवा जिने चढताना धाप लागणे, सांधेदुखी, झोप न येणे, त्वचेचे विकार, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे, मधुमेह आणि हृदयरोग ही प्रमुख लक्षणे आहेत. लठ्ठपणामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. आत्मविश्वास कमी होणे, नैराश्य आणि ताणतणाव वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात.

Crow Lifespan : कावळ्याला म्हातारं होण्यासाठी किती वर्षे लागतात? जाणून घ्या आयुष्याचं गुपित वाढत्या वजनावर मात करण्याचे उपाय

लठ्ठपणावर मात करण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे. कॅलरीजचे सेवन कमी करणे आणि कॅलरीज जाळण्यावर भर देणे, हा याचा मुख्य उपाय आहे. दररोज किमान ३० मिनिटे चालणे, योगासन, प्राणायाम, सायकलिंग किंवा हलका व्यायाम केल्यास वजन नियंत्रणात राहू शकते. गोड पदार्थ, तळलेले आणि जंक फूड टाळून घरगुती, सकस आहार घेणे फायदेशीर ठरते. वेळेवर झोप घेणे आणि तणावमुक्त राहण्यासाठी ध्यान, छंद जोपासणे आवश्यक आहे.

एका ठिकाणी बसून राहणे आणि जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातूनच मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार बळावत आहेत, हे चित्र अतिशय चिंताजनक आहे. मोबाइल, इंटरनेटमुळे मैदानी खेळ कमी झाले आहेत. त्यामुळे हालचाल कमी झाली. त्यात व्यायामाचा अभावही दिसून येत आहे. त्यामुळे लठ्ठपणाला निमंत्रण मिळते. वेळीच जागरूक राहणे गरजेचे असून, योग्य व संतुलित आहार, व्यायाम, ताणतणावावर मात करण्यासाठी सकारात्मक वृत्ती ही त्रिसूत्री अवलंबली, तर लठ्ठपणा टाळू शकतो.

- डॉ. सुनीता पाटील, वैद्यकीय तज्ज्ञ, लातूर

संकलन : संदीप शिंदे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.