उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, अजित पवार यांचं विमान बारामतीवरून मुंबईच्या दिशेनं निघालं होतं. बारामतीमध्ये धावपट्टीवर उतरताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि ते थेट जमिनीवर धडकलं, क्षणात मोठा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला, अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. आज अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर शोकसभेत बोलताना भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मोठं विधान केलं आहे, ते जालन्यात बोलत होते.
नेमकं काय म्हणाले दानवे?
आज जालना शहरात अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय शोक सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बोलताना अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला, त्यांचे काही किस्से सांगितले. यावेळी बोलताना दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. दादांनी सकाळचा जो शपथविधी घेतला होता, तो पहिला प्रयोग नव्हता तर तिसरा प्रयोग होता, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिघं मिळून सरकार चालू असं ठरलं होतं, कोण मंत्री होणार? पालकमंत्री होणार? हेही ठरलं होतं. मात्र मोठ्या पवार साहेबांनी सांगितलं की शिवसेना नको म्हणून पहिला प्रयोग फसला. त्यानंतर दुसराही प्रयोग फसला, त्यानंतर हा तिसरा प्रयोग असं दानवे यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे, आज अजित पवार यांच्यावर शोकाकूल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात शोककळा पसरली असून, आज अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बीड, पुणे सह अनेक ठिकाणच्या बाजारपेठा आज बंद होत्या.