Malegaon Sugar Factory: अजितदादांची अचानक एक्झिट अन् 'माळेगाव'ची सुवर्णाक्षरांनी नोंद; पदाधिकाऱ्यांच्या भावनांचा फुटला बांध
Sarkarnama January 30, 2026 03:45 AM

कल्याण पाचांगणे, सकाळ वृत्तसेवा

Malegaon Sugar Factory: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी, असा गळीत हंगाम यंदा चालू आहे. या कारखान्याचे दिवंगत चेअरमन व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आजवर सुमारे आठ लाख टन उसाचे क्रशिंग यशस्वीरीत्या पूर्ण झाले. वेळेत आणि शिस्तबद्ध गाळपामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा प्राप्त स्थितीतच विमान अपघातामध्ये या कारखान्याचे चेअरमन अजित पवार यांचे निधन झाले, परिणामी माळेगावचे प्रशासन व सभासद पूर्णतः पोरके झाले आहे.

Ajit Pawar AI Audio: अजित पवारांचा शेवटचा संदेश, AIची कमाल; ऑडिओ क्लीप ऐकून तुमच्याही भावना येतील दाटून

विशेषता दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने सरासरी 11.11 टक्के रिकव्हरी साध्य करत उल्लेखनीय कामगिरी केली. ऊस वेळेवर गाळप होत असल्याने वाहतूक खर्चात बचत, वजनकाट्यावर पारदर्शकता आणि पेमेंटबाबत विश्वासार्हता निर्माण झाली होती. यामुळे अजितदादांच्या नेतृत्वाला सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.

Ajit Pawar : ‘फक्त पुणेच नाही; तर 12 ही ZPत राष्ट्रवादीला मदत, हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल’

कारखान्याच्या उपाध्यक्ष संगीता कोकरे यांच्यासह संचालक मंडळाने अजितदादांच्या अध्यक्षतेखाली केवळ साखर उत्पादनावरच भर न देता, वीज निर्मिती, इथेनॉल, मोलॅसिस, प्रेसमड व इतर उपपदार्थ निर्मितीतही उच्चांक प्रस्थापित केला. त्यामुळे कारखान्याच्या आर्थिक स्थैर्याला बळ मिळाले असून माळेगाव कारखाना राज्यातील आदर्श सहकारी संस्थांच्या यादीत अग्रक्रमावर पोहोचविण्याचा प्रयत्न पवार यांनी केला. परंतू ते गेल्याने त्यांचे स्वप्न अधुरे राहिले, हे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आता कार्यरत संचालक मंडळावर येऊन ठेपली आहे.

लाडक्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी अफाट जनसागर लोटला, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी..

कारखान्याचा विस्तार, यांत्रिकीकरण, कामगार कल्याण आणि सभासद हिताच्या निर्णयांमुळे माळेगाव कारखाना प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असतानाच, अजितदादा आज अचानक ‘आनंतात विलीन’ झाले. त्यांच्या जाण्याने कारखान्याच्या प्रगतीपथावर असलेल्या प्रवासाला भावनिक धक्का बसला आहे, असे मत संचालक योगेश जगताप यांनी व्यक्त केले.

"अजितदादांच्या नेतृत्वाखाली घडलेली सहकाराची ही यशोगाथा आम्ही थांबू देणार नाही. त्यांच्या आठवणी, निर्णय आणि दूरदृष्टी कारखान्याच्या प्रत्येक यंत्रात आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात कायम राहणार आहेत. त्यांच्या पश्चात माळेगाव साखर कारखान्याचे सुमारे २२ हजार सभासद पोरके झाले असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे", असेही संचालक नितीन सातव, शिवराज जाधवराव यांनी सांगितले.

"सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत असली, तरी त्यांनी उभारलेली मूल्यव्यवस्था आणि सहकाराचा वारसा पुढील पिढीला दिशा देत राहील," अशी भावना अँड. केशवराव जगताप यांच्यासहसभासदांमधून व्यक्त होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.