Manthan 2026: मुंबईच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या के. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळातर्फे वार्षिक आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव ‘मंथन 2026' चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव खास 30 आणि 31 जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देणारा हा महोत्सव यंदा “सुर आणि ताल” या संकल्पनेवर आधारित असणार आहे.
संगीत ही केवळ कला नसून ती संस्कृतीची ओळख आहे, हा संदेश ‘मंथन 2026’ मधून अधोरेखित करण्यात येणार आहे. सुरांमधून भावना व्यक्त होतात, तर तालातून जीवनाची गती उमटते. लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, भक्ती, भावगीत तसेच आधुनिक संगीत यांचा सुरेख समतोल या दोन दिवसीय महोत्सवात अनुभवता येणार आहे. ‘मंथन’ हा केवळ स्पर्धांचा कार्यक्रम नसून तो विचार, भावना, कला आणि प्रतिभेचे सर्जनशील व्यासपीठ आहे. गेल्या काही वर्षांत या महोत्सवाने मुंबईसह विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली असून, या मंचावर सहभागी होणे अनेक विद्यार्थ्यांसाठी मानाची बाब मानली जाते.
महोत्सवात साहित्यिक कला, ललित कला, सादरीकरण कला आणि अनौपचारिक स्पर्धा अशा विविध विभागांतील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विचार मंथन (एक्स्टेम्पोर), शब्दांची अदलाबदल (भाषांतर), काव्य प्रवाह (कविता लेखन) आणि शब्दांची ओघ (पत्रलेखन) यांसारख्या साहित्यिक स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला आणि विचारक्षमतेला चालना मिळणार आहे.
ललित कला विभागात मंडला आर्ट, व्यंगचित्र, लिपण आर्ट आणि फेस पेंटिंग यांसारख्या स्पर्धांचा समावेश आहे. सादरीकरण कलांमध्ये डान्स बॅटल ‘रिदम रंबल’, जंक बँड ‘नाद निनाद’, शो-डाउन ‘सूर दंगल’ आणि लावणी ‘लावणीचा ठसका’ या रंगतदार स्पर्धा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. याशिवाय व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित ‘Mr. & Miss. मंथन’ ही स्पर्धा महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
महोत्सवाचा कळस म्हणजे फॅशन शो ‘रंगमंच रनवे’. ‘Symphony of Styles’ या थीमवर आधारित हा फॅशन शो गट पद्धतीने सादर करण्यात येणार असून, विविध शैली, परंपरा आणि सर्जनशीलतेचा अनोखा संगम यातून अनुभवता येणार आहे. हिंदुजा कॉलेजची शैक्षणिक गुणवत्ता, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि विद्यार्थ्यांची सर्जनशील ऊर्जा यांचा संगम म्हणजे ‘मंथन’. आयोजन समिती, मराठी वाङ्मय मंडळ आणि स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमातून ‘मंथन 2026’ हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.