Budget 2026 : PM किसानची रक्कम वाढणार का? अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचं लागलं लक्ष
Marathi January 30, 2026 07:28 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या रविवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीला 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागंल आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात शेती क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम यंदाच्या अर्थसंकल्पात वाढणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

PM Kisan : पीएम किसानच्या हप्त्याची रक्कम वाढणार?

वाढती महागाई आणि शेतीचा वाढता खर्च यामुळं   भारतातील शेतकऱ्यांचं लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार का? याकडे शेतकऱ्याचं लक्ष लागंल आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना सध्या 6000 रुपये मिळतात, ती रक्कम वाढून 8000 रुपये होणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये विभागून म्हणजेच प्रत्येक हप्त्यावेळी 2000 रुपये दिले जातात. सध्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम वर्ग केली जाते.  सध्या शेतकरी संघटना आणि कृषी तज्ज्ञांच्या मते शेतीचा खर्च वाढल्यानं बजेटमध्ये पीएम किसानची रक्कम 6000  रुपयांवरुन 8000 केली जातेय का ते पाहावे लागेल.

कृषी तज्ज्ञांच्या मते लघू आणि छोट्या शेतकऱ्यांना 6000 रुपयांच्या मदतीच्या जोरावर शेतीचा खर्च करणं अवघड होत आहे. जर पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवली गेली तर शेतकऱ्यांना वाढत्या बी- बियाणे, खते, कीटकानशक, डिझेल, वीज, सिंचन यातील दरवाढीमुळं जो ताण पडतोय त्यातून थोडासा दिलासा मिळू शकतो.

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्यास ग्रामीण भागात मागणी वाढू शकते. शेतकऱ्यांकडे खर्चासाठी पैसे अधिक असतील तेव्हा ग्रामीण भागातील बाजारात उलाढाल वाढेल.

पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात डिसेंबर 2018 मध्ये करण्यात आली होती. याचा हेतू छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करण्याचा होता. आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना 21 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे.

आता पीएम सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान शेतकऱ्यांना जरी पीएम किसानच्या हप्त्याची प्रतीक्षा असली तरी केंद्र सरकारकडून अद्याप रक्कम वाढी संदर्भात अधिकृत संकेत देण्यात आलेले नाहीत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.

दरम्यान, निर्मला सीतारमण यंदा नववा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या नऊ अर्थ संकल्प सादर करण्याच्या विक्रमाची बरोबरी करतील.

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.