मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा 28 जानेवारीला विमान अपघातात (Ajit Pawar Plane Crash Baramati) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनतंर सर्वत्र शोककळा पसरली आहे. काल शोकाकूल वातावरणात अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत अंत्यसंस्कार पार पडले. दरम्यान. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार? राज्याचे उपमुख्यमंत्री कोण होणार असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधीसाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. कारण, उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बारामतीला जाणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बारामतीला जाणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. चर्चा झाल्यानंतर आमदारांच्या बैठकीत गटनेता निवड आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यानंतर आमदारांचं संमती पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. तसेच प्रस्ताव राज्यपालांना देखील देण्यात येणार आहे. राज्यपालांच्या समंतीनंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो पण त्यांच्याशी उपमुख्यमंत्रिपद किंवा इतर विषयावर चर्चा झाली नाही. पक्षाचा निर्णय हा सुनेत्रा पवार आणि त्यांच्या परिवाराशी चर्चा करुनच घेतला जाणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले. अजितदादांच्या निधनामुळे आपल्याला धक्का बसला असून त्यामधून अद्याप सावरलो नसल्याचंही तटकरे म्हणाले. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचं आणि उपमुख्यमंत्रिपदाचं काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता सुनील तटकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. अजित पवारांना मुंबईवरून बारामतीला घेऊन जाणारं विमान लँड करत असताना क्रॅश झालं आणि विमानाचा स्फोट झाला. यात अजित पवार आणि इतर पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत असलेले सुप्रिया सुळे, शरद पवार, सुनेत्रा पवार हे सगळे बारामतीत दाखल झाले. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार बारामतीत आले त्यावेळी तिथं त्यांचे नातेवाईक राणाजगतिसिंह पाटील तिथं उपस्थित होते.