मुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो पण त्यांच्याशी उपमुख्यमंत्रिपद किंवा इतर विषयावर चर्चा झाली नाही. पक्षाचा निर्णय हा सुनेत्रा पवार आणि त्यांच्या परिवाराशी चर्चा करुनच घेतला जाणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले. अजितदादांच्या निधनामुळे आपल्याला धक्का बसला असून त्यामधून अद्याप सावरलो नसल्याचंही तटकरे म्हणाले.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचं आणि उपमुख्यमंत्रिपदाचं काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता सुनील तटकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली.
सुनील तटकरे म्हणाले की, "आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पण त्यांच्याशी इतर कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. सुनेत्रा पवार आणि त्यांचा परिवार हा धार्मिक विधीमध्ये आहे. त्यानंतर आम्ही त्यांच्या परिवाराशी चर्चा करू. तसेच आमचे आमदार आणि जनतेच्या मनात काय आहे हे ठरवू."
सुनील तटकरे म्हणाले की, "दादांच्या अकाली जाण्याच्या धक्क्यातून कुणीही सावरलं नाही. अजूनही दादा आमच्यातच असल्याचं वाटतंय. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात येणं हेसुद्धा क्लेषकारक आहे. याच कार्यालयात राष्ट्रवादीचं संघटन उभं केलं, त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी मी आलो आहे."
दुसरीकडे छगन भुजबळांनी राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा पवार यांच्या नावाची मागणी केली जात आहे. उद्या आमच्या पक्षाची बैठक आहे, त्यामध्ये विधीमंडळ प्रमुखांची निवड केली जाणार आहे. जर उद्याच्या बैठकीत निर्णय झाला तर उद्याच शपथविधी होईल असं भुजबळ म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. या चर्चेमध्ये पार्थ पवारही उपस्थित होते. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी देण्यात यावी आणि आपल्याला राज्यसभेवर पाठवण्यात यावं असा प्रस्ताव पार्थ पवार यांनी मांडल्याची माहिती समोर येत आहे. आता या संदर्भात राष्ट्रवादीकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे लक्ष असेल.
दरम्यान, रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथीविधीसाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बारामतीला जाणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात येणार आहे.
आमदारांच्या बैठकीत गटनेता निवड आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. यानंतर आमदारांच्या संमतीचं पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार तसेच प्रस्ताव राज्यपाल याना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. राज्यपालांच्या समंतीनंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही बातमी वाचा: