पिंपरी, ता. ३० : पिंपरी-चिंचवडसह अनेक विविध भागात उघड्या रोहित्र (डीपी) बॅाक्समुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महावितरण कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. विविध वर्दळीच्या ठिकाणच्या अनेक डीपींची झाकणे गायब झाल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. तक्रारी करूनही महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
शहरातील डीपीच्या नियमित देखभाल दुरुस्तीचे काम महावितरण कर्मचाऱ्यांकडे आहे. एखादी डीपी खराब झाली तर ती बदलण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी कंत्राटदारांकडे दिल जाते. परिसरातील धोकादायक स्थितीला असलेल्या डीपींची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. झाडाझुडपांत अडकले डीपी रस्त्याच्याकडेला डीपी बसविण्यात आली आहेत. यातील अनेक डीपीचे झाकण गायब असल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाल्हेकरवाडी सर्व्हे नंतर ११९ येथे भोंडवेनगर परिसरात महावितरणच्या डीपी खोलगट भागात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात येथे पाणी साचते. ही स्थिती धोकादायक आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
चिंचवड केशवनगर शाळेसमोर विवेक वसाहत येथील लहान मुलांच्या शाळेच्या गेटजवळील महावितरणचा डीपी बॉक्सखाली खड्डा खोदून ठेवला आहे. त्यामुळे वायर उघड्या आहेत. तरी हे धोकादायक अर्धवट काम गेल्या पंधरा दिवसांपासून ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. तरी ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.
- सुहास होनराव, चिंचवड
यमुनानगर-निगडी येथील स्कीम नंबर १० मधील ३५ नंबर बिल्डिंगमधील डिपीमध्ये धोकादायक झाड घुसले आहे. अनेकदा अधिकाऱ्यांना कळवले, परंतु ते काहीच करू शकत नाही. भंगार विक्री करणाऱ्या लोकांनी ही झाकणे अनेकदा काढून नेली आहेत. यावर एकच उपाय म्हणजे ही झाकणे फायबरची बसवणे. म्हणजे ती चोरी होणार नाहीत. परंतु संबंधित प्रशासन मात्र याची दखल घेत नाही.
- बाबा परब, यमुनानगर.
पिंपरीगाव श्रीकृष्ण सोसायटीसमोर डीपीजवळ कचरा टाकला जातो आहे. उंदीर, भटके श्वान तो कचरा इतरत्र पसरत आहे. तसेच झाडांच्या फांद्या व झावळ्या तिथेच टाकल्या आहेत. दुर्गंधी पसरून आरोग्यावर परिणाम होतो. प्रत्येक डीपीजवळ हेच चित्र दिसते.
- शरद पाचणकर, पिंपरीगाव
सर्व्हे नंबर ११९, गणपती मंदिराजवळ, भोंडवेनगर, वाल्हेकरवाडी येथे अनेक महिन्यांपासून विद्युत डीपी बॉक्स धोकादायक स्थितीत आहे. दरवाजे दोन्ही बाजूंनी उघडे आहेत. समोरच लहान मुले खेळत असतात. रस्त्याने जाणारी जनावरे ही जवळ येतात, अनेक वेळा तक्रार करूनही उपाययोजना केली नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
- लक्ष्मण कुलकर्णी, वाल्हेकरवाडी
शहरातील विविध भागांतील डीपी बॉक्सचे झाकण चोरीला जात आहे. चोरीला गेल्यामुळे त्यांचे झाकण मोठ्या प्रमाणात भंगार विक्रीसाठी नेण्यात येत आहे. तरी ज्या ठिकाणी असे उघडे डीपींचे प्रश्न आहेत. त्या ठिकाणी त्वरित उघड्या डीपींचा प्रश्न सोडविण्यात येईल. त्यांना झाकणे लावण्यात येतील.
- सोमनाथ मुंडे, कार्यकारी अभियंता, महावितरण, पिंपरी विभाग