दिवटेवाडी-निशाणघाटी मार्ग दुरुस्त
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३०ः तालुक्यातील श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणऱ्या दिवटेवाडी ते निशाणघाटी रस्ता दुरुस्तीच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यासाठी नगरपालिकेचे बांधकाम सभापती सुबोध पवार यांनी प्रयत्न केले होते.
धूतपापेश्वर मंदिर तालुक्यात नव्हे तर राज्यात प्रसिद्ध असलेले देवस्थान आहे. भाविक मोठ्या संख्येने या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. मात्र, राजापूर शहरातून मंदिराकडे जाणऱ्या मार्गावर दिवटेवाडी ते निशाणघाटी दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे भाविकांना या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत होती शिवाय मंदिरात वार्षिक महाशिवरात्र उत्सव जवळ आला आहे. यानिमित्त भरणाऱ्या यात्रेला हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. या खड्डेमय रस्त्यामुळे यात्रेला येणाऱ्या भाविकांनाही नाहक त्रास सहन करावा लागणार होता. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांसह भाविकांतून होत होती. दरम्यान, या रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून लवकरच या रस्त्याचे रुंदीकरणही होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.