ग्रंथसंपदेचा
दापोलीत जागर
दापोली ः मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधत वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी न. का. वराडकर कला आणि रा. वि. बेलोसे वाणिज्य महाविद्यालय, दापोली येथील ग्रंथालय व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रंथांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींची चरित्रे, वैचारिक साहित्य तसेच स्पर्धा परीक्षाविषयक दर्जेदार पुस्तके वाचावीत, असे आवाहन त्यांनी केले. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी वाचन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास मराठी विभागप्रमुख उत्तम पाटील, इंग्रजी विभागप्रमुख सिद्राय शिंदे, इतिहास विभागप्रमुख सुरेश खरात, मालदेव कांबळे, जयश्री गव्हाणे, ग्रंथालय सहाय्यक सुमित कदम, आदी प्राध्यापक वर्ग विद्यार्थी प्रतिनिधी कैलास उजाळ व रिया वैद्य यांची उपस्थिती लाभली.
ज्ञानदीपमध्ये
विविध स्पर्धा
दापोली ः येथील ज्ञानदीप विद्यामंदिर माध्यमिक विभागात मराठी भाषेचा गौरव, जतन आणि प्रचार यासाठी राबवण्यात आलेला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मोठ्या उत्साहात झाला. १४ ते २८ जानेवारी या कालावधीत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबाबत अभिमान व जाणीव निर्माण करण्यात आली. या पंधरवड्यानिमित्त परिसंवाद, हस्ताक्षर स्पर्धा, शिक्षक व विद्यार्थी कथाकथन, मराठी भाषा संवर्धन विषयावर व्याख्यान, मराठी वाचनकट्टा, अनुवाद लेखन, ग्रंथालयास पुस्तक भेट असे विविध उपक्रम राबवण्यात आले. मराठी भाषेच्या प्रसारासाठी योगदान देणाऱ्या मराठी भाषिक व्यक्ती, मराठी अभाषिक विद्यार्थी तसेच प्रसारमाध्यमांशी संबंधित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. ‘सकाळ’चे बातमीदार राधेश लिंगायत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.