‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये ‘महाभारत’ फेम अभिनेते साकारणार मिर्झा राजे जयसिंग
admin February 03, 2026 01:24 AM
[ad_1]

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा मराठी ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य आणि उत्कंठावर्धक अनुभव घेऊन येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी आग्रा स्वारीवर आधारित हा चित्रपट केवळ कथा नाही, तर शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा उत्कंठावर्धक अध्याय आहे. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपट येत्या 6 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत इस्सार एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व्यक्तिरेखेत झळकणार आहेत. ते मिर्झा राजे जयसिंग या प्रभावशाली भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या अनुभवी आणि भारदस्त अभिनयामुळे या व्यक्तिरेखेला एक वेगळंच परिमाण लाभलं आहे. मिर्झा राजे जयसिंग ही व्यक्तिरेखा केवळ राजकीय सत्तेचं प्रतीक नसून, रणनीती, कूटनीती आणि सत्तासंतुलनाचा सूक्ष्म खेळ दर्शवणारी आहे.

महाभारत मालिकेतील दुर्योधनासह अनेक संस्मरणीय भूमिकांमुळे ओळखले जाणारे पुनीत इस्सार या भूमिकेतून इतिहासातील या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला प्रभावीपणे साकारताना दिसतील. भव्य सेट्स, सशक्त पटकथा आणि तगड्या कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा आणि संस्मरणीय टप्पा ठरणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणाऱ्या आहेत. शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक अत्यंत जोखमीची घटना होती. या भेटीतून त्यांच्या नेतृत्वाची, कर्तृत्वाची खरी झलक दिसली. महाराजांचं शौर्य आणि धोरणात्मक रणनीती या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही हार मानली नाही. त्यांच्या शौर्याची, धैर्याची आठवण करून देत इतिहासाच्या सुवर्णपानांमध्ये दडलेला हा प्रेरणादायी अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाच्या माध्यमातून भव्य स्वरूपात आणण्याचा आनंद दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटात अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे.

छत्रपती शिवराय केवळ धैर्य आणि नेतृत्वामुळे नव्हे, तर त्यांच्या तल्लख बुद्धिमत्ता, अद्वितीय रणनीती आणि विचारसरणी यामुळे सदैव आपल्या स्मरणात आहेत. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक जोखमीची घटना होती. पण या भेटीतून त्यांच्या कणखर नेतृत्वाची खरी झलक दिसली. याच ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट आहे.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.