मुंबईत दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात अवघ्या 24 तासांत अकोल्याशी संबंधित धागेदोरे समोर आले आहेत. या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्य शुभम लोणकर याने स्वीकारल्याचा दावा केला जात आहे. पोस्टमध्ये रोहित शेट्टी यांना थेट धमकी देण्यात आली असून, हा गोळीबार फक्त ‘ट्रेलर’ असल्याचं नमूद करण्यात आले आहे. तसेच या पोस्टद्वारे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी इशारा देण्यात आल्याचं दिसून येते.
कोण आहे हा शुभम लोणकर…?
शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील नेव्होरी गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तर या आधीही अकोला पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत तब्बल तीन पिस्टूल आणि जिवंत काडतूस जप्त केले होते. तसेच बंदूक तस्करी प्रकरणात तो मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं होत. लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. शुभम लोणकर आणि बिश्नोई यांच्यातील कॉल आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगही तपास यंत्रणांकडे देण्यात आले आहेत.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी पोस्टही याच शुभम लोणकर याने सोशल मीडियावर केली होती. दरम्यान, ही फेसबुक पोस्ट नेमकी कोणी केली, ‘शुभम लोणकर’ आणि ‘शुभम रामेश्वर लोणकर’ हे एकच व्यक्ती आहेत का, याचा तपास केंद्रीय यंत्रणा आणि पोलीस करत असून सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, अकोला कनेक्शनमुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं आहे.
नेमकं प्रकरण काय?
बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहू परिसरातील निवासस्थानी 1 फेब्रुवारी रोजी गोळीबार झाला. हा गोळीबार मध्यरात्री करण्यात आला. गोळीबाराच्या घटनेनंतर तपासात एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करून चौकशी केली. त्यानंतर अकोला कनेक्शन समोर आले आहे. शुभम लोणकर या आरोपीने हल्ल्याची जबाबदारी घेतली.