IND A vs USA : जगदीशनचा शतकी तडाखा, आयुष-तिलकची फटकेबाजी, यूएसएएमोर 239 धावांचं आव्हान
Tv9 Marathi February 03, 2026 02:45 AM

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी (Icc T20i World Cup 2026) इंडिया ए टीमने धमाका केलाय. मुख्य स्पर्धेआधी इंडिया ए टीमने पहिल्याच सराव सामन्यात यूएसएच्या गोलंदाजांची (India A vs USA) धुलाई केली आहे. भारतीय फलंदाजांनी 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 238 धावा उभारल्या आहेत. भारताला इथवर पोहचवण्यात ओपनर एन जगदीशन याने प्रमुख भूमिका बजावली. तर कॅप्टन आयुष बदोनी यानेही योगदान दिलं. तसेच दुखापतीनंतर परतलेल्या तिलक वर्मा यानेही ठिकठाक धावा करत आपण मुख्य स्पर्धेसाठी फिट असल्याचं दाखवून दिलं. आता यूएसएचा मुख्य संघ इंडिया ए समोर 239 धावांचा पाठलाग करताना कुठवर मजल मारतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

इंडिया ए टीमची फटकेबाजी

भारताला 238 धावांपर्यंत पोहचवण्यात पहिल्या 4 फलंदाजांनी प्रमुख योगदान दिलं. एन जगदीशन याने शतक झकावलं. आयुष बदोनी याने अर्धशतकी खेळी केली. तर प्रियांश आर्या आणि तिलक वर्मा या दोघांनी सन्मानजनक धावा केल्या.

यूएसएने टॉस जिंकला

यूएसएने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. प्रियांश आर्या आणि एन जगदीशन ही सलामी जोडी मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरली. यूएसएने भारताला 43 धावांवर पहिला झटका दिला. प्रियांश आर्या 28 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर एन जगदीशन आणि तिलक वर्मा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी धमाका केला. भारताला 238 धावांपर्यंत पोहचवण्यासाठी या जोडीने भागीदारीबाबत प्रमुख भूमिका बजावली. या दोघांनी 55 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली. तिलक वर्मा 24 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह 38 रन्स केल्या.

जगदीशनने कॅप्टन बडोनीसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागारी केली. जगदीशनने या दरम्यान अवघ्या 49 चेंडूत शतक केलं. तर आयुषने अर्धशतक झळकावलं. मात्र जगदीशन शतकानंतर आऊट झाला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 35 बॉलमध्ये 73 रन्सची पार्टनरशीप केली. जगदीशनने 55 बॉलमध्ये 11 फोर आणि 4 सिक्ससह 104 रन्स केल्या. तर आयुष आणि रियान पराग ही जोडी नाबाद परतली.

आयुषने 26 बॉलमध्ये 6 फोर आणि 4 सिक्ससह नॉट आऊट 60 रन्स केल्या. तर रियान पराग याने 2 धावा जोडल्या. यूएसएसाठी शुभम रांजने, अली खान आणि जसदीप सिंह या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.